माझ्या पतीचे सर्वपक्षीयांसोबत असलेल्या चांगल्या संबंधाची ही पोचपावती – ऋतुजा लटके

मुंबई : १७ ऑक्टोबर – अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतील भाजपचे उमेदवार मुरजी पटेल यांनी अखेर माघार घेतली आहे. भाजपच्या बैठकीत हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. भाजपच्या या निर्णयाचं उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांनी आभार मानले आहेत. माझ्या पतीचे सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांशी चांगले संबंध होते. त्याची पोचपावती मला मिळाली आहे. त्यामुळे भाजपने उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयाचे मी स्वागत करते आणि त्यांच्या या निर्णयाबद्दल मी त्यांचे ऋणी आहे, अशी प्रतिक्रिया ऋतुजा लटके यांनी व्यक्त केली आहे.
भाजपने मुरजी पटेल यांनी अर्ज मागे घेतल्याचं जाहीर केल्यानंतर ऋतुजा लटके यांनी पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मी सर्व प्रथम सर्वांचे आभार मानते. सर्व पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी उमेदवारी अर्जमागे घेण्याची पत्रं दिली. त्यांनी अर्ज मागे घेतला. प्रत्येकजण म्हणत होते रमेश लटके आमच्यासोबत होते. त्यांचे सर्वांशी चांगले संबंध होते. त्यामुळे हा निर्णय झाला असावा. माझ्या पतीचे सर्वच राजकीय नेत्यांशी जिव्हाळ्याचे संबंध होते. त्याची पोचपावती मला मिळाली, असं ऋतुजा लटके म्हणाल्या.
बिनविरोध निवडणूक व्हावी हे सर्वांचं म्हणणं होतं. मी सर्वांचे आभार मानते. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची गेल्या आठ दिवसांपासून धावपळ सुरू होती. प्रचारासाठी त्यांनी कष्ट घेतले. त्या सर्वांचे आभार मानून ऋणी राहील. माझ्या पतीचे सर्वांशी चांगले संबंध होते. राज ठाकरे आणि प्रताप सरनाईक यांनी मैत्रीची कदर केली. ज्येष्ठ नेते शरद पवारांनी पाठिंबा दिला. त्यांची ऋणी राहील. अंधेरीचा विकास हेच माझं पहिलं ध्येय असणार आहे, असं त्या म्हणाल्या.
दरम्यान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज मीडियाशी संबोधित करताना अंधेरीची पोटनिवडणूक लढणार नसल्याचं जाहीर केलं. मुरजी पटेल आज अर्ज मागे घेणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे अंधेरीची पोटनिवडणूक बिनविरोध होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.

Leave a Reply