… वार-पलटवार – विनोद देशमुख

…लोकशाहीच्या पेटवा मशाली

चला. शिवसेनेच्या दोन्ही गटांना नवं नाव, नवं चिन्ह मिळालं एकदाचं ! आणि, पहिल्यांदाच दोन शिवसेना अस्तित्वात आल्या !! उद्धवसेनेला ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ नाव मिळालं आणि शिंदेसेना म्हणजे ‘बाळासाहेबांची शिवसेना’. उद्धव ठाकरेंना चिन्ह मिळालं ‘मशाल’, तर एकनाथ शिंदेंना मिळाली ‘ढाल-तलवार’. यामुळे प्रश्न तात्पुरता सुटला असला तरी, खरी लढाई पुढेच आहे. अंधेरी (पूर्व) विधानसभा आणि नंतरच्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमधून लोकांचा कल जरूर कळेल. ही जनतेच्या न्यायालयातील ‘लिटमस टेस्ट’ असेल. पण, निवडणूक आयोग आणि सुप्रीम कोर्टाचं घटनापीठ यांचे अंतिम निर्णय आल्याशिवाय या गुंत्याचा निकाल मात्र लागणार नाही. त्यासाठी आपल्या व्यवस्थेत किती दिवस वाट पाहावी लागेल, हे कोणालाच सांगता येणार नाही.
तूर्तास, बाळासाहेब नावाचा बाप पक्षाच्या नावात मिळाल्यामुळे दोन्ही गट खुश आहेत. शिंदेसेनेचे बाळासाहेब कोणते, मला माहीत नाही, ही आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया मात्र निव्वळ बालिश ! अहो, बाळासाहेब ठाकरे यांच्या नावावर आणि त्यांचा वारस कोण, यासाठीच तर एवढं महाभारत घडलं, हे साऱ्या जगाला माहीत आहे. (काही विकृत लोकांनी तर बाळासाहेब देवरस, बाळासाहेब आंबेडकर आणि इतरही काही बाळासाहेबांची नावं घेऊन शिंदेसेनेची टिंगल करण्याचा प्रयत्न करीत स्वत:ची नसलेली अक्कल पाजळली !) आजचं वास्तव हे आहे की, शिवसेना दोघांची अन् बाळासाहेबही दोघांचे ! यातील कोण बापाचं नाव राखतो, प्रतिष्ठा वाढवतो आणि वारस सिद्ध होतो, याकडे उभ्या महाराष्ट्रासह देशाचं लक्ष आहे.
मशाल चिन्ह शिवसेनेसाठी तीन तपांपूर्वीच लाभदायी ठरलं होतं. 1985 मध्ये छगन भुजबळ हे त्यांचे एकमेव आमदार निवडून आले. नंतर लगेच मुंबई महानगरपालिकाही पहिल्यांदाच ताब्यात आली. शिवसेनेचे पहिले खासदार मोरेश्वर सावे (संभाजीनगर) हे 1989 मध्ये मशालीवरच निवडून गेले. हा इतिहास उत्साहवर्धक असला तरी, याच भुजबळांनी सेनेत पहिलं मोठं बंड केलं आणि पुढच्या आणखी मोठ्या- राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे- उठावांना प्रेरणा दिली, सावेंचा मुलगा अतुल आज भाजपाचा आमदार आहे, हे सत्य नाकारता येईल का ? याचा अर्थ, मशालीची झळ स्वत:ला सुद्धा लागू शकते, हे लक्षात ठेवायलाच हवं.
ढाल-तलवार हे चिन्ह म्हणजे थेट छत्रपती शिवाजी महाराजांशीच संबंध ! महाराज म्हणजे बाळासाहेबांसह अख्ख्या महाराष्ट्राचं दैवत. आणि शिवरायांचा प्रत्येक मावळा ढाल-तलवार घेऊनच स्वराज्यासाठी आणि स्वातंत्र्यासाठी लढला. मराठी संस्कृतीचं ते प्रतीकही आहे. शिंदेसेना स्थापन झाली तेव्हा उद्धवसेनेनं आरोप केला होता- “राहिले ते मावळे, उडाले ते कावळे !” पण चिन्हवाटपात मावळ्यांच्या हातात मशाल आली अन् ‘कावळ्यां’ना मात्र मावळ्यांची ढाल-तलवार मिळाली ! उद्धवसेनेची मशाल ‘घड्याळ’ बांधलेल्या ‘हाता’त आहे. याउलट, शिंदेसेनेला दोन तलवारी आणि एक ढाल मिळाली. म्हणजे डबल अटॅक आणि डिफेन्सही. शिंदेसेनेचा एक नेता यावर म्हणाला- “दोन तलवारींच्या एका घावात दोन काय, तीन तुकडे !” बोला आता.
“दुसऱ्यांना जाळण्यापेक्षा मशाली अन्यायाविरुद्ध पेटल्या पाहिजे” अशी मार्मिक प्रतिक्रिया व्यक्त करून एकनाथ शिंदे यांनी उद्धवसेनेला टोलाही लगावला. स्थापनेपासून बाळासाहेबच शिवसेनेचे सूत्रधार असले तरी, त्यांनी लोकशाही पद्धतीने पक्ष चालविला आणि नेहमी इतरांनाच संधी दिली. स्वत: सरकारी पद घेणं टाळलं. 2019 मध्ये मात्र उद्धव ठाकरेंनी स्वत:च मुख्यमंत्री होऊन आणि सोबतच मुलालाही मंत्री बनवून ठाकरेंची घराणेशाही रुजू केली. त्यामुळे खऱ्या शिवसैनिकांवर झालेल्या अन्यायातूनच ‘शिंद्यांचं बंड’ घडलं. तेव्हा, मशाल हाती आली म्हणजे ओक्के असं समजण्याचं कारण नाही !
आता पक्षांच्या नावांबद्दल थोडंसं. शिवसेना हे नाव दोन्ही गटांनी वापरू नये, असा आदेश देणाऱ्या निवडणूक आयोगानं स्वत:च दोन्ही गटांच्या नव्या नावात शिवसेना शब्द कसा काय मान्य केला, याचं आश्चर्य वाटल्यावाचून राहत नाही. एकटा शिवसेना शब्द चालत नाही. पण जोडजंतर केलेल्या नावात तो शब्द चालतो, हा काय प्रकार आहे ? तसेच, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि बाळासाहेबांची शिवसेना, ही काय पक्षांची नावं झाली !! विचित्र आणि लांबलचक. तर्काच्या अन् बुद्धीच्या पल्याड जाणारा आणि स्वत:चाच आदेश निरर्थक ठरविणारा (महंमद तुघलकी !) निर्णय वाटतो हा. वादात सापडलेलं नाव बाद म्हणजे बादच. मग ते कोणत्याही स्वरूपात चालणार नाही, अशी कठोर भूमिका घेण्याची गरज होती. आपल्याकडील घटनात्मक संस्था सुद्धा ढिसाळ आणि राजकारणाला अवास्तव महत्त्व देऊन वागतात, हेच यातून दिसून येतं. अशानं लोकशाही मजबूत आणि लोकाभिमुख होण्याऐवजी राजकारणाच्या आणि घराण्यांच्या खुंट्यालाच बांधलेली राहणार अन् नेत्यांना तेच तर हवं आहे. म्हणून लोकशाहीतील जाणत्याअजाणत्या राजांविरुद्ध मशाली पेटल्या पाहिजे आणि त्यांच्याशी लढले पाहिजे. घराणेशाही नही चलेगी, नही चलेगी

विनोद देशमुख

Leave a Reply