राज्यातील सर्वात महाग सीएनजी नागपुरात

नागपूर : ११ ऑक्टोबर – पेट्रोलचे दर सातत्याने वाढत असल्यामुळे ‘सीएनजी’ संवर्गातील चारचाकी वाहन बऱ्याच नागरिकांनी घेतले. परंतु, दहा दिवसांत ‘सीएनजी’चे दरही तब्बल सहा रुपये किलो या दराने वाढले आहे. ही वाहने घेतलेल्यांच्या खिशाला जास्तच कात्री बसणार आहे.पेट्रोल आणि डिझेल या इंधनावर धावणाऱ्या कारच्या तुलनेत ‘सीएनजी’वर धावणाऱ्या कारचा ‘ॲव्हरेज’ जास्त असतो.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून वारंवार ‘सीएनजी’ वाहनांचे सांगण्यात येणारे फायदे आणि पेट्रोलच्या तुलनेत हे इंधन स्वस्त पडत असल्याने नागपुरातही अनेकांनी ‘सीएनजी’वर चालणारे वाहन घेतले गेले. दरम्यान, दहा दिवसांपूर्वी नागपुरात १०८ रुपये किलो या दराने ‘सीएनजी’ची विक्री होत होती. परंतु, दहा दिवसांतच तब्बल ६ रुपये किलोने दर वाढून ते ११४ रुपयांवर गेले आहे. त्यातच पुणे, नाशिक, मुंबई या भागात ‘सीएनजी’चे दर नागपूरपेक्षा जवळपास ३० ते ३५ रुपये किलोने स्वस्त आहेत.
नागपुरात ‘सीएनजी’ची थेट ‘पाईपलाईन’ नसल्यामुळे येथे दर जास्त असल्याचे पंप चालकांचे म्हणणे आहे.नागपुरात हरियाणा सिटी गॅस या कंपनीचे विक्रेते रॉमॅटचे चार पंप आहेत. केवळ याच पंपावर ‘सीएनजी’ची विक्री केली जाते. या पंपांची संख्या वाहनांच्या तुलनेत कमी असल्याने नेहमीच या पंपावर कारचालकांच्या मोठ्या रांगा दिसतात.

Leave a Reply