शिकरण : एक अंडर एस्टीमेटेड पक्वान्न!

लहानपणी “मामाच्या गावाला जावू या” या गाण्यात “मामाची बायको सुगरण, रोज रोज पोळी शिकरण” असा उपरोधक उल्लेख येतो आणि नकळत्या वयापासून शिकरण म्हणजे जिला काहीच कुशलतेनं स्वयंपाक येत नाही, अशा गृहीणीने करायचा पदार्थ असा संस्कार आपल्यावर केला जातो. तेंव्हा सगळ्यात पहिल्यांदा या गाण्यावरच अब्रुनुकसानीचा दावा शिकरणाने ठोकला पाहिजे.
सगळ्यात पहिली बाब म्हणजे शिकरणाला फक्त शिकरण असंच संबोधन आहे. केळाचं शिकरण म्हणून अपमान करू नये ही कडक सुचना. जसे की मराठवाड्यात “उसळ” म्हणजेच साबुदाण्याची खिचडी. आम्ही उसळीचा खिचडी म्हणून अपमान करत नाही.
दूसरी बाब शिकरण करताना “केळाच्या चकत्या करून..” असं कुणी म्हटलं की समजायचं याला शिकरणातलं ही समजत नाही.
साल काळं पडत चाललेलं छिटेदार केळ ही शिकरणाची पहिली अनिवार्य अट आहे. हे केळ संपूर्ण साल काढून वाडग्यात पाचही बोटांचा वापर करून कुस्करायचं असतं. नीट कुस्करण्याची नोम तोम आलापी पार पडल्यावरच पुढचा शिकरण ख्याल मार्गी लागतो.
वाडग्यात कुस्करलेल्या केळावर सकाळी तापवून साय आलेलं दूध ओतायचे असते. वाटीने मोजून दूध घेणार्‍यांनी पुढचा मजकुर वाचु नये. मुळात काही मोजून न घेणे हीच शिकरण टेस्टी होण्यासाठीची पहिली अट आहे.
आई आणि आज्जी यांचा डोळा पुरता लागलेला आहे, वामकुक्षी चरम सिमेवर आहे तो नेमका क्षण साधून या दूधावरची साय शिकरणात पाडून घ्यायची असते.
सगळ्या मिश्रणात डाव्या हाताने बचाकभर साखर ओतायची असते. यासाठी साखरेच्या डब्याचा आवाज मुळीच होता कामा नये. नसता शत्रुला जाग येवून भयानक प्रसंग ओढवू शकतो.
बोटाने ही साखर हलवायची असते आणि मग या अमृततुल्य पदार्थासोबत सकाळच्या शिळ्या पोळ्या डाव्या हाताने एक एक न मोजता घेत फडशा पाडायचा असतो. शिकरण शिळ्या पोळीसोबतच खावे लागते. तव्यावरची गरम पोळी शिकरणासोबत शास्त्र संमत नाही.
शिकरण हा अतिशय स्वाभिमानी असा पक्वान्न श्रेणीतला पदार्थ असल्याने तो पोळीसोबत एकटाच “ओरपायचा” असतो. तक्कु, लोणचं, दाण्याची चटणी (शेंगादाण्याची चटणी म्हणणार्‍यांनी पुढचं वाचु नये. आमच्याकडे दाण्याची चटणी एकच असते. तीही परत दाणे तेल सुटेपर्यंत कुटून केलेली. मिक्सरमधल्या चटणीला जीव्हा शास्त्र वेद मान्यता नाही.) इतकाच पदार्थ तोंडी लावायला चालतो. भाजी, वरण भात असल्या पदार्थांचा स्पर्शही चालत नाही.
शिकरण कुठल्याही वेळी खायचे नसते. अहिर भैरव सकाळीच गायचा. दरबारी रात्रीच. पुरिया सायंकाळीच. तसे शिकरणावर मुलतानी म्हणजे दूपारचा शिक्का आहे.
पुरणाची पोळी, गुलाब जाम, आंब्याचा रस, श्रीखंड, चांगल्या तुपात तळलेली जिलेबी, बासुंदी यांच्या श्रेणीतच याची वेळ दूपारचीच आहे.
बाकीच्या पक्वान्नांना तरी सोबत इतर चटण्या कोशींबिरी, कुरड्या, पापड्या, मसाले भात, गोड भात, फोडणीचं वरण, साधं वरण, कढी, वडे, भजे, पातळ भाजी, कोरडी भाजी असले सगळे सैन्य लागते मग कुठे लढाईला महाराज हत्तीवरच्या अंबारीत बसून बाहेर पडतात.
शिकरण केवळ चटणी, लोणच असे लढवय्ये दोन चार विश्वासु सैनिक घेवून घोड्यावर हातात तलवार घेवून उसळणार्‍या सेनापती सारखे आहे. वेडात मराठे वीर दौडले तसे हे खव्वय्याच्या पोटात गडप होवून जाते.
बाकीच्या पक्वांनांत जायफळ केशर असे पदार्थ वापरून डोळ्यावर झापड येण्याची व्यवस्था करावी लागते.
शिकरणाला काहीच लागत नाही. भांडं बुडाला लागले की तळात राहिलेले साखरेचे दोन चार दाणे बोटावर घेवून चाटले की ब्रह्मानंदी टाळी लागते.
शिकरणाच्या या रंगलेल्या ख्यालाची भैरवीही मोठी विलक्षण असते. दूपारी हे पक्वान्न पोटात गेल्यावर अनिवार अशी सुरसुरी येते आणि आपण ओसरीवर, ढाळजात नुसत्या जमिनीवर तक्क्या उशाला घेऊन पडतो. एव्हाना माय माउलीची झोप झालेली असते. तीनं चहासाठी फडताळ उघडून दूधाचे भांडे बाहेर काढलेले असते. स्वयंपाक घरात केळीच्या सालींचा पुरावा तिला दिसतो आणि मग दूधावरची नाहीशी झालेली साय पाहून मधुर आवाजात ती माउली स्त्री सुक्त गाते,
“मेल्यानं शिकरणावर टाकुन साय संपवली वाटतं, मुडद्याला तुप कुठून देवू आता!”
ही भैरवी कानावर पडली की मगच त्या मैफिलीची सांगता होते.
असे हे शिकरण पुराण. ऋग्वेदाच्या शेवटच्या मंडलात तिसर्‍या खंडात याचे सुक्त दिलेले आहे. याचीच पुढे काॅपी करून भगवान कृष्णाने गीतेत सांगितले. ती मुळ ऋचा अशी आहे:
यदा यदाही पोट्टेस्य
ग्लानिर्भवती तहान भुक:
परित्राणाय चं क्षुधावंतास
शिकरणाय मी युगे युगे
नवव्या आणि दहाव्या अवतारांबद्दल विद्वानांमध्ये मतभेद आहेत. पण अकरावा अवतार परमेश्वराने शिकरणाच्या रूपात घेतला आहे, याबाबत कुणाला कसला संदेह नाही आणि ज्यांना असेल त्यांच्याशी आम्हाला काही देणे घेणे नाही.
(ही पोस्ट लिहिण्यासाठी वाडगाभर शिकरण संपवून वामकुक्षीचे अवघड तप पूर्ण केल्यावरच मला शक्ती प्राप्त झाली हे अभ्यासुंनी नोंदवून ठेवावे.)

लेखक अनामिक !

समाजमाध्यमावरुन साभार….

Leave a Reply