पक्षातील नेत्यांनी कटकारस्थान करून मुख्यमंत्रीपदावरुन काढले – सुशीलकुमार शिंदे

सोलापूर : १९ सप्टेंबर – काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदावरुन स्वपक्षीय नेत्यांवर निशाणा साधला आहे. पक्षातील नेत्यांनी कटकारस्थान करून मुख्यमंत्रीपदावरुन काढले, असा आरोप सोलापुरात सुशीलकुमार शिंदे यांनी केला आहे. “महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावरुन काढल्यानंतर मला आंध्र प्रदेशमध्ये राज्यपाल म्हणून पाठवण्यात आले. त्यानंतर दिल्लीच्या मंत्रिमंडळात गेलो. तेव्हापासून त्यांना पराभव पत्करावा लागला” असा निशाणा नाव ने घेता स्वपक्षीय नेत्यांवर सुशीलकुमार शिंदे यांनी साधला आहे.
सोलापुरात महाराष्ट्र गुजराती समाज महामंडळातर्फे ‘भारत गौरव पुरस्कार’ शिंदे यांना प्रदान करण्यात आला. या सत्कार समारंभात त्यांनी हे विधान केले आहे. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असताना गुजराती समाजाला दोन टक्के आरक्षण दिले होते. या कामाचा आता विसर पडल्याची खंत सुशीलकुमार शिंदे यांनी यावेळी बोलून दाखवली. माझा जावाई गुजराती असल्याने या समाजाला आरक्षण दिले, असे शिंदे यांनी मस्करीत म्हणताच सभागृहात हशा पिकला. राजकीय चढ-उतार येत असतात मात्र आपण प्रामाणिकपणे काम केले पाहिजे, असे शिंदे या कार्यक्रमात म्हणाले.
विधानसभा निवडणुकीपासून राज्यात आत्तापर्यंत विविध राजकीय घडामोडी घडल्या आहेत. राज्यात भाजपाने सर्वाधिक जागा मिळवल्यानंतरही शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे सरकार स्थापन झाले होते. राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची धुरा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जवळपास अडीच वर्ष सांभाळली. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेशी बंडखोरी करत शिंदे गट स्थापन केला. सध्या राज्यात भाजपा आणि शिंदे गटाची सत्ता आहे.

Leave a Reply