मुंबईत ईडीच्या धाडीत ४८ कोटी रुपयांचे ९१ किलो सोने व ३४० किलो चांदी जप्त

मुंबई : १५ सप्टेंबर – अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) दक्षिण मुंबईतील झवेरी बाजार येथील दोन लॉकर आणि एका सराफा व्यापाऱ्याच्या कार्यालयातून ४८ कोटी रुपये किमतीचे ९१.५ किलो सोने आणि ३४० किलो चांदी जप्त केली आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी यासंबंधी शोध सुरू केला असून बुधवारी तो पूर्ण केला. त्यांनी जप्त केलेले सोने-चांदी सरकारी तिजोरीत जमा करण्यात आले आहेत.
मुंबईतील पारेख एल्युमिनेक्स नावाच्या कंपनीने एका सरकारी बँकेकडून २२९६ कोटी ५८ लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. त्यानंतर विविध कंपन्यांच्या माध्यमातून या पैशांची हेराफेरी करण्यात आली होती. याच प्रकरणी ईडीने कारवाई केली आहे. ८ मार्च २०१८मध्ये पारेख एल्युमिनेक्स कंपनीवर मनी लॉंड्रिग प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
ईडीच्या छापेमारीदरम्यान अधिकाऱ्यांना काही लॉकरच्या चाव्या सापडल्या. या चाव्याबाबत विचारणा केल्यानंतर त्यांना खासगी लॉकरबाबत माहिती मिळाली. तिथे तब्बल ७६१ लॉकर्स ईडी अधिकाऱ्यांना आढळून आले. त्यातले तीन लॉकर्स हे रक्षा बुलियन कंपनीचे होते. या पैकी दोन लॉकर्समध्ये ९१.०५ किलो सोने आणि १५२ किलो चांदी सापडली आहे. तर, रक्षा बुलियन कंपनीच्या कार्यालयात तब्बल १८८ किलो चांदी आढळून आली. ही सारी संपत्ती ईडीने जप्त केली आहे.
लॉकर्स ज्या रुममध्ये आहेत तिथे कोणत्याही पद्धतीचे नोंदीचे रजिस्टर उपलब्ध नव्हते. लॉकर्सची बँक केवायसीही अपडेट करण्यात आली होती. तसंच, सीसीटीव्ही कॅमेरादेखील नव्हता. त्याचबरोबर, झवेरी बाजारातील वरिष्ठांची परवानगी न घेता तिथे लॉकर्स ठेवण्यासाठी रुम बनवण्यात आली होती. ईडीने जप्त केलेल्या मालमत्तेची एकूण किंमत ही ४७. ७६ कोटी इतकी आहे. या प्रकरणी ईडीने आधी ४६. ९७ कोटी आणि १५८.२६ कोटी रुपयांची संपत्ती वेगवेगळ्या दिवशी जप्त केली होती.
पारेख एल्युमिनेक्स नावाच्या कंपनीने एका सरकारी बँकेकडून २२९६ कोटी ५८ लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. मात्र, कंपनीने त्या रकमेचा वापर ज्यासाठी कर्ज घेतलं त्यासाठी केलाच नाही. उलट हे पैसे काही बनावट खाते व बनावट कंपन्या उघडून त्यांच्याशी व्यवहार झाल्याचे दाखवत पैशांची हेराफेरी केली. व बँकेकडून घेतलेल्या या कर्जाची परतफेड केलीच नाही. दरम्यान, या कंपनीवर दोन गुन्हे दाखल करण्यात आले असून स्वतंत्र तपास सुरू आहे.

Leave a Reply