दुसरा प्रकल्प आम्ही महाराष्ट्राला देऊ असे म्हणणे म्हणजे बालिशपणा – सुप्रिया सुळे

पुणे : १५ सप्टेंबर – वेदान्तचा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेल्यानंतर राज्यातील राजकारण आता तापू लागले आहे. या विरोधात आज राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने पुण्यात लॉलिपॉप हातात घेऊन आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे याही सहभागी झाल्या होत्या. यावेळी माध्यामांशी बोलताना सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्र सरकारवर जोरदार टीका केली.
महाराष्ट्राला मेरीटवर जो प्रोजेक्ट मिळाला होता, तो गुजरातमध्ये नेण्यात आला, ही अत्यंत दुर्देवी बाब आहे. वेदान्तच्या जागी दुसरा प्रकल्प आम्ही महाराष्ट्राला देऊ असं म्हणणं बालिशपणा आहे. मुख्यमंत्र्यांनीही हे विषय जरा गांभीर्याने घेतले पाहिजे. हा छोटा विषय नाही. राज्यातल्या अडीच ते तीन लाख युवकांच्या बेरोजगारीचा प्रश्न आहे”, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारवर केली आहे.
“तळेगावला या प्रकल्पासाठी जागा निश्चित केली असताना, हा प्रकल्प गुजरातला का गेला? याचं उत्तरं राज्य सरकारने द्यायला हवं. तुम्ही सत्तेत आहात, त्यामुळे याची जबाबदारी तुम्ही घ्यायला हवी. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे राज्याचे पालक आहेत. त्यांनीच आपल्या मुलांवर अन्याय करावा, असा प्रकार आहे ”, असेही त्या म्हणाल्या.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात वेदान्त समूहाने सेमीकंडक्टर प्रकल्पाबाबत महाराष्ट्राशी चर्चा सुरू केली होती. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर जुलैच्या शेवटच्या आठवड्यात ‘वेदान्त ग्रुप’ आणि ‘फॉक्सकॉन’ कंपनीच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. वेदान्तने तैवानच्या फॉक्सकॉन कंपनीशी भागीदारी केली करत या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये तीन टप्प्यांमध्ये प्रकल्प उभारण्याचे प्रस्तावित होते. मात्र, मंगळवारी वेदान्त समूहाने आपला प्रकल्प गुजरातमध्ये उभारण्यात येणार असल्याचे जाहीर केले आणि महाराष्ट्राकडे येऊ घातलेला आणखी एक प्रकल्प गुजरातकडे गेल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर विरोधकांडून शिंदे सरकारवर जोरदार टीका करण्यात येत आहे

Leave a Reply