प्रकल्प महाराष्ट्रातून निसटलाच कसा? राजकारणाच्या पलीकडे जाऊन ह्या विषयाकडे बघायला हवे – राज ठाकरे

मुंबई : १४ सप्टेंबर – फॉक्सकॉन-वेदांता हा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेल्यामुळे राज्यातलं राजकारण चांगलंच तापलं आहे. हा प्रकल्प गुजरातला जाणार असल्याची घोषणा होताच शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली. आदित्य ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राज्य सरकार आणि भाजपवर जोरदार निशाणा साधला. तर भाजप आणि शिंदेंच्या मंत्र्यांकडून विरोधकांना प्रत्युत्तर देण्यात आलं. गुजरातपेक्षा चांगलं पॅकेज तुमचं सरकार असताना फॉक्सकॉन-वेदांताला का देण्यात आलं नाही? असा सवाल उद्योगमंत्री उदय सामंत आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी विचारला.
महाराष्ट्रातून प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे सुरू झालेल्या वादात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनीही उडी घेतली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी राज ठाकरे यांनी केली आहे.
‘फॉक्सकॉन- वेदांताचा सेमीकंडक्टर बनवण्याचा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेला. ह्या प्रकल्पाची एकूण गुंतवणूक १ लाख ५८ हजार कोटींची आहे. हा प्रकल्प पुण्याजवळ तळेगाव येथे होणार होता. प्रचंड रोजगारनिर्मितीची क्षमता असणारा प्रकल्प महाराष्ट्रातून निसटलाच कसा?’ असा सवाल राज ठाकरे यांनी विचारला आहे.
‘हा प्रकार गंभीर आहे. म्हणूनच ह्या विषयाची सखोल चौकशी व्हायलाच हवी. महाराष्ट्र हे गुंतवणूकदारांच्या प्राधान्यक्रमाचं राज्य होतं. अशा राज्यातून गुंतवणुकीचा उलटा प्रवास सुरु होणं हे चांगलं लक्षण नाही. राजकारणाच्या पलीकडे जाऊन ह्या विषयाकडे बघायला हवं’, असं ट्वीट राज ठाकरे यांनी केलं आहे.

Leave a Reply