…वार-पलटवार – विनोद देशमुख

दिल्लीसमोर झुकणार नाही, सरळ लोटांगणच घालू

महाराष्ट्रातील बहुतांश राजकीय नेत्यांचं एक बरं असतं. थोडं कुठं खुट्ट झालं की नेहमीचं पालुपद जनतेच्या तोंडावर फेकून मारायचं- “आम्ही दिल्लीसमोर कधीच झुकणार नाही हो !”  संपूर्ण लोकशाहीवादी राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाचे सलग तेविसाव्या वर्षी राष्ट्रीय अध्यक्ष होताना शरद पवारांनीही हीच गर्जना केली. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची शिवसेनाही अधूनमधून हा राग आळवत असतेच.
पण, थोडं तपासलं तर काय दिसतं ? मराठी साम्राज्याच्या प्रारंभी छत्रपती शिवरायांनी आणि शंभूराजांनी, तर शेवटच्या काळात पेशव्यांनी दिल्लीच्या तख्ताला झुकवलं होतं. त्यानंतर मात्र आपल्यावरच झुकण्याची वेळ आली ! हिमालयाच्या मदतीला धावलेले सह्याद्री यशवंतराव चव्हाण यांना दिल्लीनं पंतप्रधान नाही होऊ दिलं. शरद पवारांनाही लोकसभा विरोधी पक्षनेतेपदाच्या पुढे जाण्यापासून रोकलं गेलं. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री वेळोवेळी दिल्लीनंच ठरविला. मग, कोणत्या न झुकण्याच्या बाता मारतो आम्ही ?
सोनिया गांधींच्या विदेशी मुद्यावर काॅंग्रेस सोडणारे पवार काही महिन्यातच महाराष्ट्र आणि केन्द्रात काॅंग्रेसच्या मंत्रिमंडळात सहभागी झाले अन् गेली तेवीस वर्षे राष्ट्रवादी त्यांच्या सोबत आहेत. हे काय आहे ? 2019 मध्ये काॅंग्रेस-राष्ट्रवादीच्या कुबड्यांवर सरकार बनविणारे उद्धव ठाकरे दिल्लीत जाऊन सोनिया गांधींना भेटले, ते काय होते ? तरीही म्हणायचे, हम झुकेंगे नही ! वर, महाराष्ट्राची अस्मिता, महाराष्ट्राचा अपमान म्हणत प्रादेशिक अहंकारही जोपासायचा. आपण संघराज्यात आहोत, तेव्हा राजधानी दिल्लीचे वर्चस्व थोडेफार राहणारच. तेथे आपला वट प्रस्थापित करण्याऐवजी त्याचा बाऊ करून जनतेला सर्वकाळ मूर्ख बनविण्याचे दिवस गेले बरं ! स्वत: लोटांगण घालायचे अन् दुसऱ्यांना मात्र झुकण्याचे आरोपी बनवायचे, हे लोकांना आता कळू लागले आहे राजेहो…

विनोद देशमुख

Leave a Reply