मंत्रिमंडळ बैठकीतच देवेंद्र फडणवीसांनी अब्दुल सत्तारांना सुनावले खडे बोल

मुंबई : १३ सप्टेंबर – खाते वाटपावरून मुख्यमंत्री शिंदेंची डोकेदुखी वाढवलेल्या कृषी मंत्री अब्दुल सत्तारांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काहीही बडबडू नका, अशा शब्दांत मंत्रिमंडळ बैठकीत खडसावले. तसेच योजनांबद्दल घोषणा करताना तुम्ही अगोदर मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करा, असे आदेशच फडणवीसांनी मंत्र्यांना दिले आहेत. सत्तारांनी यानंतर बैठकीतून काढता पाय घेतला.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात कामे होत नव्हती, निधी मिळत नव्हता, असा आरोप शिवसेनेच्या अनेक आमदारांनी केला. त्यानंतर शिवसेनेचा एक गट फुटून राज्यात शिंदे-फडणवीसांचे सरकार स्थापन झाले. सरकार सत्तेवर येताच मंत्रिपदासाठी इच्छुकांनी दबाव टाकण्यास सुरुवात केली. मंत्री अब्दुल सत्तार यात आघाडीवर होते. मुख्यमंत्री शिंदे यांचे टेन्शन वाढले होते. अखेर मंत्री पदावर सत्तार यांची नियुक्ती करण्यात आली. मंत्री झाल्यापासून सत्तार नवीन योजनांच्या घोषणा करत आहेत. काही मंत्र्यांकडूनही घोषणांचा सपाटा सुरु आहे. मात्र मंत्र्यांनी केलेल्या घोषणांची पूर्तता करताना सरकारची कोंडी होत आहे. उतावीळ मंत्री सोमवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निशाण्यावर आले.
सोमवारी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये केंद्राची प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजना राज्यात नवीन सन्मान योजना राबवावी किंवा केंद्रातील योजनेत राज्याचा काही वाटा समाविष्ठ करून शेतकऱ्यांना मदत योजना सुरू करण्यासंदर्भात विचार मंथन सुरू होते. दरम्यान, यासंदर्भातील माहिती बातमी प्रसारमाध्यमांमध्ये लिक झाली. ही बाब फडणवीसांना कळताच त्यांनी मंत्रिमंडळ बैठकीत कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांना धारेवर धरले. तसेच माहिती फोडल्याचा जाब विचारला. अजून कोणताही निर्णय झाला नसताना ही माहिती तुम्ही जाहीर कशी केली.? असा परखड सवाल फडणवीसांनी केला. यावर मी जाहीर नव्हे तर, विचार सुरू असल्याचे स्पष्टीकरण सत्तार यांनी दिले. त्यामुळे फडणवीसांच्या रागाचा पारा वाढला. कोणताही सारासार विचार न करता घोषणा करु नका. कोणताही निर्णय परस्पर जाहीर करु नका. मनात येईल त्या घोषणा करत सुटू नका, असे खडेबोल उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी अब्दुल सत्तार यांना सुनावले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही समज दिली. अखेर सत्तारांनी नमते घेत, बैठकीतून काढता पाय घेतला.

Leave a Reply