पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या मोर्चामध्ये जोरदार गदारोळ, पोलीस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये वादावादी

कोलकाता : १३ सप्टेंबर – पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या मोर्चामध्ये जोरदार गदारोळ झाला. काही ठिकाणी पोलीस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये वादावादी झाली. पोलिसांनी मोर्चाचे आयोजक विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी, खासदार लॉकेट चॅटर्जी आणि राहुल सिन्हा यांच्यासह भाजप कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे. या सर्वांना कोलकाता मधील लाल बाजार येथील पोलीस हेडक्वार्टरमध्ये नेण्यात आलं आहे. काही ठिकाणी भाजप आणि टीएमसीच्या कार्यकर्त्यांमध्ये देखील वादावादी झाली.
भाजपनं आज सकाळी कोलकातामधील सचिवालयावर नबन्ना अभिजन मोर्चा काढला होता. यांअतर्गत भाजपचे राज्यातील कार्यकर्ते मोर्चासाठी कोलकाता आणि हावडा मध्ये दाखल झाले होते. भाजपनं या मोर्चामध्ये ममता बॅनर्जी यांच्या सरकारमधील कथित भ्रष्टाचारावरुन आक्रमक भूमिका घेतली होती.
पोलिसांनी हावडा येथील सचिवालयाकडे जाणारे रस्ते बंद केले होते. पूर्व मिदनापूर भाजप आणि टीएमसीच्या कार्यकर्त्यांमध्ये वादावादी झाली होती. तामलूकमध्ये भाजप आणि तृणमूलचे कार्यकर्ते यांच्यात वाद झाला. पोलिसांनी कोलकाता जाणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांच्या बसेस उत्तर २४ परगणा जिल्ह्यात थांबवल्या होत्या.
भाजप नेत्यांनी रस्त्याचा मार्ग बंद केल्यानंतर नावेतून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्यांना त्रिवेणी नदीवरच अडवलं. पोलिसांनी सुवेंदू अधिकारी यांना अलीपूरमध्ये ताब्यात घेतलं. राहुल सिन्हा यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतलं. ममता बॅनर्जींकडे लोकांचं समर्थन नसल्याचा आरोप देखील अधिकारी यांनी केला.

भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष दिलीप घोष यांनी पश्चिम बंगालमध्ये पोलीस इतक्या संख्येने कसे आले, असा सवाल केला. गुजरात पोलीस या राज्यातून अंमली पदार्थांचा व्यवसाय करणाऱ्यांना अटक करते, मात्र या राज्यातील पोलिसांचं लक्ष नसल्याचं दिलीप घोष म्हणाले.
गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि तृणमूल काँग्रेस यांच्यातील संघर्ष वाढला आहे. ममता बॅनर्जी आणि सुवेंदू अधिकारी यांच्यातील संघर्ष तीव्र झाला आहे. सुवेंदू अधिकारी एकेकाळी ममता बॅनर्जींचे सहकारी होते. मात्र, ते भाजपमध्ये गेल्यानंतर पक्षाचे प्रमुख नेते बनले आहेत. भाजपनं त्यांच्यावर विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी दिली आहे. विधानसभेची निवडणूक भाजपनं सुवेंदू अधिकारी यांच्या नेतृत्त्वात निवडणूक लढवली होती. मात्र, भाजपला पराभवाचा सामना करावा लागला होता.

Leave a Reply