यवतमाळमध्ये माहेरहून पैसे आणण्यासाठी १९ वर्षीय तरुणीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न

यवतमाळ : १२ सप्टेंबर – माहेरहून पैसे आणण्याचा तगादा लावत एका 19 वर्षीय तरुणीला सासरच्या लोकांनी जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना पुसद ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या काळी दौलत खान इथे घडली. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. तरुणीच्या सावधानतेमुळे या घटनेत तिचा जीव वाचला असून ती किरकोळ जखमी झाली आहे.
फुलसावंगी येथील मुस्कान परवीन हिचा विवाह काळी दौलतच्या शाहरुख शेख सलीम याच्याशी 24 ऑक्टोबर 2019 रोजी झाला होता. त्यानंतर सासरच्या लोकांनी परविनला माहेरून पैसे आणण्यासाठी मानसिक आणि शारीरिक त्रास देणं सुरू केलं. ते एवढ्यावरच थांबले नाहीत तर तिला मारहाणही करत होते. त्यानंतर मुलीचा संसार सुखात चालवा म्हणून परवीनच्या वडिलांनी चाळीस हजार रुपये तिच्या पतीला दिले. मात्र तरीसुद्धा ते पैशासाठी तगादा लावत होते.
पीडितेला पती शाहरुख, सुलतान शेख सलीम , शबाना बी शेख इनुस , रुबीनाबी मुनाफ या चार जणांनी मानसिक आणि शारीरिक त्रास दिला. त्यानंतर तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. यात ही 19 वर्षीय तरुणी किरकोळ जखमी झाली. या घटनेनंतर विवाहित तरुणीने कोणालाही माहीत न होऊ देता फोनवरुन वडिलांशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. त्यानंतर वडील आले आणि मुलीला माहेरी घेऊन गेले. मग पुसद ग्रामीण पोलिसांत याबाबत तक्रार देण्यात आली.
एवढंच नव्हे तर काही दिवसांपूर्वी सासूने पीडितेला जबरदस्तीने दूध पिण्यास दिलं होतं. हे दूध प्यायल्यानंतर तिला उलट्या मळमळ आणि चक्कर यायला लागली आणि तोंडातून फेसही येऊ लागला होता. त्यावेळी तिला एका खाजगी रुग्णालयात दाखल करून उपचार करण्यात आले. पीडितेनं सासरच्या मंडळींविरुद्ध केलेल्या आरोपांवरुन पुसद ग्रामीण पोलिसांनी चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Leave a Reply