गणपती विसर्जनाच्या पद्धतीने नवनीत राणा पुन्हा निशाण्यावर

अमरावती : ११ सप्टेंबर – “गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या…. गणपती चालले गावाला चैन पडेना आम्हाला…” अशा घोषणांनी लाडक्या गणरायाला शुक्रवारी ठिकठिकाणी भावपूर्ण निरोप देण्यात आला. गेली १० दिवस बाप्पाच्या सेवेत रममान होऊन गणेशभक्तांनी गणरायाची मनोभावे सेवा केली. शुक्रवारी मात्र, बाप्पाला निरोप देताना डोळे भरुन आले होते. “रिकामं झालं घर, रिता झाला मखर, पुढच्या वर्षी लवकर येण्यास निघाला आमचा लंबोदर” असं म्हणत भक्तांनी आपल्या गणरायाचं विसर्जन केलं. एकीकडे अशा भावपूर्ण वातावरणात विसर्जन होत असताना असताना दुसरीकडे अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्या गणेश विसर्जन पद्धतीने त्या नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आल्या आहेत.
राज्यभरात गणरायाचं थाटात विसर्जन होत असताना नवनीत राणा यांच्या घरच्या बाप्पाचंही विसर्जन झालं. पण त्यांच्या विसर्जन पद्धतीमुळे त्या नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आल्या आहेत. बाप्पाच्या मूर्तीचं विसर्जन करण्यासाठी नवनीत राणांनी आधी बाप्पाला डोक्यावर घेत विसर्जन तलावापर्यंत घेऊन गेल्या आणि नंतर मुर्तीला तलावात थेट अक्षरश: फेकून देत विसर्जन केलं. ज्या पाण्यात राणांनी बाप्पाचं विसर्जन केलं, ते पाणी खूपच अस्वच्छ होतं, गढूळ होतं. नवनीत राणांचा हाच व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय. नेटकऱ्यांनी राणांना तुफान ट्रोल केलंय. तुम्ही सतत हिंदू धर्म लोकांना शिकवता मग गणपती विसर्जन कसं करतात हे तुम्हाला माहिती नाही का? असे प्रश्न लोक राणांना विचारत आहेत. राणांची गणपती विसर्जनाची पद्धत अनेकांना खटकली आहे.
कथित लव्ह जिहाद प्रकरणावरुन पोलीस ठाण्यात जाऊन थटथटाट करुनही नवनीत राणा यांना मुलीच्या जबाबानंतर तोंडघशी पडावं लागलं. या साऱ्या प्रकरणाने नवनीत राणा देशभर चर्चेत आल्या. गेल्या काही महिन्यांपासून मग हनुमान चालिसा असो वा ‘मातोश्री’शी घेतलेला पंगा… नवनीत राणा माध्यमांमध्ये चर्चेत आहेत. ठाकरेंचे कट्टर विरोधक अशी राणांची ओळख बनलेली आहे. सध्या प्रखर हिंदुत्ववादाची लाईन राणा दाम्पत्य रेटत आहेत. यादरम्यान दाणा दाम्पत्य अनेकदा अडचणीतही आलं आहे. हनुमान चालिसा पठणाच्या वादावेळी तर राणा दाम्पत्याला जेलवारीही झाली.

Leave a Reply