दिवस नेत्रदान प्रचार प्रसाराचे – डॉ. छाया नाईक

२४ जूनला आपल्या विवाहाच्या २५ व्या वाढदिवसाला आपण नेत्रदान करूया असे आम्ही ठरवले होते. पण तेव्हा ते कुठे करायचे, कसे करायचे या बद्दल काही कळत नव्हते. त्यामुळे २००५ मध्ये सेवानिवृत्त झाल्यावर माझ्या जोडीदाराने जेव्हा माधव नेत्रपेढीचे काम करायचे ठरवले तेव्हा त्यांच्या मागोमाग मी सुद्धा माधव नेत्रपेढीत जाऊ लागले. व नेत्रपेढीच्या कामाची सुरुवातच आम्ही नेत्रदानाचा फॉर्म भरून केली.
त्या वेळी अनेक पतीपत्नी जोडीने माधव नेत्रपेढी मध्ये कार्यकर्ते म्हणून येत होते. नेत्रपेढीचे काम फक्त नेत्रदानापुरते मर्यादित नव्हते. संस्थेसाठी पैशांची जमवाजमव करणे हे एक मोठे काम असे. त्याच बरोबर नेत्रज्योती बाधित मुलांसाठी त्यांच्या पुस्तकांच्या ध्वनिफिती तयार करायच्या असत. त्या साठी ध्वनिफिती विकत घ्याव्या लागत. रात्री अपरात्री नेत्रदानासाठी फोन येत. तेव्हा डॉक्टरांना सोबत देण्याचे काम करावे लागे.
केवळ नागपुरात एक नेत्रपेढी असून चालणार नव्हते. संपूर्ण महाराष्ट्रात प.पू. श्री गुरुजींच्या जन्म शताब्दी वर्षानिमित्त १०० नेत्रपेढ्या सुरु कराव्यात असे लक्ष्य ठेवण्यात आले होते. त्या साठी एक नेत्रदान यात्रा काढण्यात आली होती. एका बस व कार मधून ही यात्रा नागपूरमधून सुरु झाली. ३५ नेत्रपेढ्या सुरु झाल्या. पण त्याच वेळी एक गोष्ट लक्षात आली. नुसती नेत्रपेढी असून भागणार नव्हते. नेत्रदानाची महती आणि माहिती लोकांपर्यंत पोचवण्यासाठी नेत्रदानाचा प्रचार आणि प्रसार होणे आवश्यक आहे. नेत्रदान यात्रेदरम्यान नेत्रदानावरील एक पथनाट्य लिहिण्यात आले होते व अनेक गावांच्या गजबजलेल्या चौकात ते सादर करण्यात आले होते. त्याचा योग्यतो परिणाम होऊन नेत्रपेढीच्या उद्घाटनाला गर्दी होत होती. त्यामुळे नेत्रदानाच्या प्रचारासाठी पथनाट्य सादर करून त्या द्वारे प्रचार करायचा असेही ठरले. नुसत्या भाषणांच्या माध्यमातून हे काम होणे कठीण नव्हते. पण त्यापेक्षा हा मार्ग जास्त प्रशस्त व परिणामकारक होता.
नेत्रदानाचा प्रचार कुठे व कसा करायचा याचा विचार सुरु झाला. नेत्रदानाबाबत लोकांमध्ये अनेक गैरसमज होते. म्हणजे जिवंतपणी डोळे काढून नेतील, डोळे काढायसाठी मृतदेह हॉस्पिटलमध्ये न्यावा लागेल, डोळे काढल्यावर मृतदेह विद्रूप दिसेल, या जन्मी नेत्रदान केले तर पुढच्या जन्मी आपण आंधळे होऊ, हे आणि अशासारखे अनेक गैरसमज दूर होणे आवश्यक होते. दुसरी महत्त्वाची अडचण म्हणजे एखाद्या घरी मृत्यू झाल्यावर “आता या देहाचे नेत्रदान करा” असे सांगणे अनेकांना अमानवीय वाटायचे. म्हणून मग आपण लहान मुलांपासून या प्रचार प्रसाराला सुरुवात करू असे ठरवले. त्यामुळे शाळांमध्ये कार्यक्रम सुरु करायचे ठरले. तेव्हा आम्ही मुलांना सांगत असू की ‘एखाद्याच्या मृत्यूची बातमी कळली की “ कधी नेणार?” या प्रश्नाच्या आधी “नेत्रदान केले का?” – हा प्रश्न विचारत जा.’ त्याच बरोबर नेत्र पेढीचा फोन नंबर त्यांच्याकडून पाठ करून घेत असू. हळू हळू मोठाली हॉस्पिटल्स, ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रे, महिला मंडळे, कार्पोरेट ऑफिसेस, ग्रामपंचायती, खेडेगावात भरणाऱ्या जत्रा अशा अनेक ठिकाणी आम्ही नेत्रदानाच्या प्रचारासाठी आम्ही जाऊ लागलो.
मग वेगवेगळ्या ठिकाणी सादर करण्यासाठी वेगवेगळी नाटके लिहिल्या व सादर केल्या जाऊ लागली. म्हणजे हॉस्पिटलमध्ये डॉक्टर, नर्सेस व इतर लोक यांचे संवाद, कॉलेजेस मध्ये डोळ्यांवरील हिंदी चित्रपटांची गीते असलेले संवाद, महिला मंडळात तेथील बायकांचे विनोदी संवाद, कार्पोरेट ऑफिसेस मध्ये पतीपत्नीमधील विनोदाची झालर असलेले संवाद, जत्रेच्या ठिकाणी वगनाट्याच्या धर्तीवर नाटक अशी अनेक नाटके लिहिल्या गेली व पथनाट्याच्या अंगाने सादर करण्यात आली. नाटकात काम करण्याची हौस असलेले अनेक जण त्यामुळे नेत्रपेढीशी जोडले गेले.
२५ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर हा पंधरवडा भारतात राष्ट्रीय नेत्रदान पंधरवडा म्हणून सर्वत्र साजरा करण्यात येतो. १९८५ मध्ये तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त नेत्रदान करून दरवर्षी हे पंधरादिवस नेत्रदान पंधरवडा म्हणून साजरे करण्याची सूचना केली होती. तेव्हापासून सर्व शासकीय चिकित्सालयात ह्या पंधरा दिवसात एखादा कार्यक्रम तरी घेतला जातो. आमच्या प्रचार प्रासाराची कीर्त्ती सर्वत्र पसरली होती. त्यामुळे आम्हाला खूप ठिकाणांहून कार्यक्रम सादर करायला बोलावले जात असे. हे दिवस आमच्यासाठी मंतरलेले होते.
सकाळी उठून नेत्रपेढी गाठायची. १५ – २० – २५ कार्यकर्ते आपापल्या गाड्यांनी यायचे. दिवसभरात दोन चार ठिकाणी कार्यक्रम करायचे. कधी कधी इतके कार्यक्रम करायची आमंत्रणे असायची की आम्हाला कार्यकर्त्यांच्या २-४ चमू काराव्या लागायच्या. अनेक कार्यक्रम परगावी असायचे. अनेकदा उत्साही व सुगरण कार्यकर्त्या काही ना काही छान छान खाद्यपदार्थ घेऊन यायच्या, त्यांचा आस्वाद घ्यायचा मग धाब्यावर जेवायचे व संध्याकाळी घरी यायचे. टपरीवर चहा पिणे हा तर सगळ्यांचा खूपच आवडता कार्यक्रम असायचा. त्यात झालेल्या कार्यक्रमांचा आढावा घेताघेता एकमेकांची ‘खिचाई’ करायची, यात एक वेगळीच मजा असायची. नेत्रदान पंधरवड्यात अनेकदा गणपती व महालक्षम्या असायच्या. मग त्या दोन दिवसांत, ज्यांच्या घरी महालक्ष्म्या नाहीत अशा माझ्या सारख्या कर्यकर्त्यांवर नेत्रदानावर भाषणे देत एकाकी खिंड लढवण्याची वेळ येत असे. एका वर्षी एका दिवशी मी ४ भाषणे दिली होती. अनेकदा कार्यकर्ते निघाले आहेत, आणि त्यापैकी कोणाची तरी गाडी बंद पडली आहे, त्यामुळे त्यांना पोचायला उशीर होतो आहे, समोर खूप गर्दी जमली आहे, असेही व्हायचे. अशावेळी वेळ “मारून” नेण्याची शिकवणही अनुभवातून मिळत गेली.
कोरोनाच्या साथीमुळे दोन वर्षे आमचे नेत्रदान प्रचार प्रसाराचे कार्यक्रम बंद होते. जर कोरोनाची साथ नसती, तर अनेक ठिकाणी नेहमी प्रमाणे अनेक कार्यक्रम सादर झाले असते. या वर्षी आता नव्या दमाने नेत्रदान प्रचार – प्रसार सुरु झाला आहे. पण त्या काळातील अनेक कार्यकर्ते आता काळाच्या पडद्याआड गेले आहेत. नवीन कार्यकर्ते जोडले जात आहेत. सोशल मिडीया सहाय्याला असल्याने प्रचार प्रसाराचे मार्गही बदलत आहेत. आता सत्तरीकडे वाटचाल करत असलेल्या किंवा अमृत महोत्सव साजरा झालेल्या अनेक कार्यकर्त्यांच्या आठवणी मनात दाटून येतात. एकमेकांना फोन करून त्या ‘धमाल’ दिवसांच्या आठवणींची उजळणी होते. आता अनेक जण शारीरिकदृष्ट्या थकले आहेत. पण “नेत्रदान पखवाडा” आला की थकलेल्या गात्रांमध्ये उत्साह संचारतो, आणि अजूनही वाटतं की काहीतरी करुया………. ते मंतरलेले दिवस कदाचित पुन्हा येणार नाहीत. पण ‘काहीतरी करू या’ ह्या मंत्राचा जप मात्र अंतरात सतत सुरु असतो.

डॉ. छाया नाईक
९८९०००२२८२

Leave a Reply