दहशतवाद्याच्या कबरीचे सुशोभीकरण म्हणजे देशद्रोह, उद्धव ठाकरेंनी जनतेची माफी मागावी – चंद्रशेखर बावनकुळे

नागपूर : ८ सप्टेंबर – १९९३ मुंबई बॉम्बस्फोटातील दोषी याकुब मेमनच्या कबरीचे सुशोभीकरण केल्याचे समोर आल्यानंतर भाजपाकडून तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. दहशतवाद्याच्या कबरीचे सुशोभीकरण म्हणजे देशद्रोह आहे, असा आरोप भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. मुख्यमंत्रीपद टिकवण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी किती तडजोड केली, याचे स्पष्टीकरण देण्याची मागणी बावनकुळे यांनी केली आहे.
या घटनेमुळे महाराष्ट्र कलंकित झाला आहे. उद्धव ठाकरे यांनी राज्याच्या जनतेची माफी मागावी, अशी मागणी बावनकुळे यांनी पत्रकार परिषदेत केली आहे. कबरीच्या सुशोभीकरणासाठी जबाबदार लोकांवर गंभीर गुन्हे दाखल करुन कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी शिंदे सरकारला केली आहे.
“आम्ही कट्टर हिंदूत्ववादी आहोत. आमचे हिंदूत्व कोणीही हिरावू शकत नाही, असे उद्धव ठाकरे वारंवार सांगत असतात. मग त्यांनी ही तडजोड का केली? त्यांनी याविरोधात धनुष्यबाण हातात का घेतला नाही” असा सवाल बावनकुळेंनी केला आहे. कबरीच्या सुशोभीकरणाकडे तत्कालीन गृहमंत्र्यांनी दुर्लक्ष का केले? जर याबाबत गृहमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंना कळवले असेल तर ते गप्प का बसलेत? उद्धव ठाकरेंनी सत्तेसाठी कोणती पातळी गाठली? असे अनेक प्रश्न बावनकुळेंनी यावेळी उपस्थित केले आहेत.

Leave a Reply