लाखकुळे आले तरी साहेबांच्या पायावरच्या नखाची वाळूही उडणार नाही – जितेंद्र आव्हाड

मुंबई : ७ सप्टेंबर – भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल बारामतीचा दौरा केला. या दौऱ्यात शरद पवार जात असलेल्या मारुतीच्या मंदिरात जाऊन त्यांनी पूजाही केली. त्यांनी यावेळी 2024 च्या लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघ विजयी करून दाखवू असा विश्वासही व्यक्त केला. पण, ‘बावनकुळे नाही तर लाखकुळे आले तरी साहेबांच्या पायावरच्या नखाची वाळूही उडणार नाही. 1990 नंतर शरद पवार यांचे नाव घेतल्याशिवाय कोणाचेही राजकारण पूर्ण होत नाही. हे विरोधकांना चांगलेच ठाऊक आहे. शरद पवार यांच्यावर सातत्याने खोटेनाटे आरोप करण्यात आले. मात्र त्याचा महाराष्ट्राच्या जनतेवर कोणताही परिणाम झाला नाही’ असा टोला राज्याचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी भारतीय जनता पक्षाला लगावला आहे. ट्विटच्या माध्यमातून जितेंद्र आव्हाड यांनी हा टोला लगावला.
कोणत्याही निवडणुकीला सामोरे जाताना शरद पवार बारामतीमध्ये असलेल्या श्री मारुतीच्या मंदिरात दर्शन घेऊन आपला उमेदवारी अर्ज भरतात. त्याच मंदिरात चंद्रशेखर बावनकुळे यांनी बारामतीचा गड जिंकू अशी प्रार्थना केली. त्यामुळे मंदिरातला श्री मारुती देखील हसत होता असा चिमटा बावनकुळे यांना जितेंद्र आव्हाड यांनी काढला आहे.
बारामती पवारांचा गड मानला जातो. परंतु देशात असे अनेक गड उद्धवस्त झाले आहेत. जेव्हा संघटन मजबूत होते, संघर्ष निर्माण करण्याची ताकद येते. त्यावेळी चांगले-चांगले गड उद्धवस्त झाले आहेत. गड कोणा एकाच्या मालकीचा राहत नाही. कोणाचे वर्चस्व राहत नाही. वेळेनुसार बदल होतो . हा देशाचा इतिहास आहे. त्यामुळे बारामतीचा गड २०२४ ला भाजपने जिंकलेला दिसेल, असा आशावाद भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला होता.

Leave a Reply