दसरा मेळावा घेण्यावर शिंदे गट ठाम – दीपक केसरकर

पुणे : ७ सप्टेंबर – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बाळासाहेबांच्या विचारांवर चालतात. बाळासाहेबांच्या प्रथा पंरपरा कायम ठेवण्याचा मुख्यमंत्र्यांचा विचार आहे आणि दसरा मेळावा त्याचाच एक भाग आहे. त्यामुळे दसरा मेळावा घेण्यावर शिंदे गट ठाम आहे, असे मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले आहे. ते पुण्यात बोलत होते. विभागाच्या आढावा बैठकीसाठी ते आले होते. दसरा मेळावा शिवसेनेचा की शिंदे गटाचा असा वाद सध्या सुरू आहे. त्याचबरोबर ठिकाणावरूनही हा वाद सुरू आहे. दसरा मेळाव्यावर शिंदे गट दावा करत आहे. दीपक केसरकर यांनी याबाबत शिंदे गटाची भूमिका स्पष्ट केली तसेच शिवसेनेवर टीकाही केली आहे. ते म्हणाले, की शिवसेनेने दसरा मेळावा घेतला तर त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला स्टेजवर बोलवावे, म्हणजे लोकांना कळेल कोण बाळासाहेबांच्या विचारापासून दूर गेले आहे, असा टोला त्यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.
सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीवर मी बोलणार नाही, जे काही होईल ते कायद्याने होणार आहे. प्रकरण न्यायालयात असल्याने त्यावर चर्चा करणेही योग्य होणार नाही, असे ते म्हणाले. दसरा मेळाव्यासंदर्भातील बी प्लॅनविषयी ते म्हणाले, की याविषयीची चर्चा मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत झालेली नाही. मुख्यमंत्री आणि त्यांचे सहकारी बाळासाहेबांच्या विचारांवर चालतात. त्यांनी ज्या प्रथा-परंपरा घालून दिल्या आहेत, त्याचे पालन व्हावे, असे त्यांचे नेहमी म्हणणे असते. त्यामुळे मुख्यमंत्री काय निर्णय घेतात, ते पाहावे लागेल, असे केसरकर म्हणाले.
दसरा मेळावा शिंदे गटाचाच होईल, हे माझ्या तोंडून का वदवून घेत आहात, असा प्रतिप्रश्न केसरकर यांनी केला. यावेळी उद्धव ठाकरेंवर त्यांनी टीका केली. ज्यांना अजूनही काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जायचे आहे, त्यांनी दसरा मेळावा त्यांच्यासोबत घ्यावा, असा टोला लगावला आहे. सध्याची संख्या बघितली तर मुंबई महापालिकेत भाजपा आणि आमचे 150 नगरसेवक येणार आहेत, असा दावाही यावेळी केसरकर यांनी केला आहे.

Leave a Reply