ज्यांच्याबरोबर 40 आमदार त्यांचाच दसरा मेळावा शिवाजी पार्कवर व्हावा – रावसाहेब दानवे

मुंबई : ६ सप्टेंबर – शिवतीर्थावर यंदा दसरा मेळावा कोण घेणार यावरून वाद पेटला आहे. आता या वादात भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी उडी घेतली आहे. ‘ ज्यांच्याबरोबर 40 आमदार त्यांचाच दसरा मेळावा शिवाजी पार्कवर व्हावा. ज्यांच्याकडे सर्वाधिक खासदार त्यांचा शिवाजी पार्कवर अधिकार आहे, असं म्हणत रावसाहेब दानवे यांनी शिवसेनेला डिवचले आहे.
दिल्लीमध्ये पत्रकारांशी बोलत असताना रावसाहेब दानवे यांनी शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला आहे. यावेळी अमित शहा यांच्या बैठकीमध्ये काय चर्चा झाली, याची माहितीही दिली.
धोका हा केवळ आमच्यासोबत केला नाही तर महाराष्ट्रासोबत केला होता. शिवसेना आणि भाजपची युती होती, त्यावेळी शिवसेना आणि भाजप युतीला मत मागितली होती. तशी जनतेनं आम्हाला युती म्हणून मतं दिली होती. शिवसेनेला मुख्यमंत्रिपद देऊ असं कोणताही शब्द आम्ही दिला नव्हता. परंतु, जेव्हा जेव्हा अमित शहा आले. त्यावेळी आमच्या नेत्यांनी देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री राहतील त्यावेळी सांगितलं. पण तेव्हा उद्धव ठाकरेंनी आक्षेप घेतला नाही. जेव्हा निकाल लागला तेव्हा जागा कमी आल्यामुळे भाजप सरकार स्थापन करू शकत नाही, असं त्यांच्या लक्षात आलं तेव्हा त्यांनी शब्द फिरवला आणि आमच्याकडे सर्व पर्याय खुले असल्याचे सांगून आम्हाला धोका दिला. या राजकीय धोक्याबद्दल अमित शहा बोलले आणि ते योग्यच आहे, असंही दानवे म्हणाले.
ज्या शिवसेनेला लोकांनी मतदान केलं. ज्या पक्षाचे आमदार जास्त आहे. ज्यांच्याबरोबर 40 आमदार त्यांचाच दसरा मेळावा शिवाजी पार्कवर व्हावा. ज्यांच्याकडे सर्वाधिक खासदार त्यांचा शिवाजी पार्कवर अधिकार आहे, असंही दानवे म्हणाले.
उद्धव ठाकरेंनी अडीच वर्षात काम केले नाही. आता डायलॅागबाजी करत आहेत. गवताला भाले फुटतील, केसाला भाले फुटतील. आता ते दिवस गेले आहे. आगामी काळ हा निवडणुकीचा काळ आहे. या निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांनी सक्रीय राहावे, निवडणुकीच्या कामासाठी अमित शहा यांनी मार्गदर्शन केलं आहे. स्थानिक स्वराज्य निवडणूक आम्हीच जिंकणार आहोत, यात आम्हाला विश्वास आहे, असंही दानवे म्हणाले.

Leave a Reply