ऋषी सुनक यांचा पराभव करत लिझ ट्रस ब्रिटनच्या पंतप्रधानपदी विराजमान

लंडन : ६ सप्टेंबर – ब्रिटनच्या परराष्ट्रमंत्री लिझ ट्रस यांनी सोमवारी भारतीय वंशाचे माजी अर्थमंत्री ऋषी सुनक यांचा पराभव करून हुजूर पक्षातील आपल्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब केल़े त्यामुळे ट्रस या ब्रिटनच्या पंतप्रधानपदी विराजमान होणार आहे.
हुजूर पक्षाच्या सदस्यांनी ऑनलाइन आणि टपालाद्वारे १७२,४३७हून अधिक मतदान केले. त्यात ट्रस यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी सुनक यांचा पराभव केला. मावळते पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या जागी आता ४७ वर्षीय ज्येष्ठ कॅबिनेटमंत्री असलेल्या ट्रस या ब्रिटनच्या तिसऱ्या महिला पंतप्रधान बनतील. भारतीय वंशाची पहिली व्यक्ती ब्रिटनच्या पंतप्रधानपदी विराजमान होण्याची ऐतिहासिक आशा सुनक यांच्यामुळे निर्माण झाली होती, मात्र ट्रस यांच्या विजयाने सुनक यांचे पंतप्रधानपदाचे स्वप्न भंगले ट्रस जिंकल्या असल्या तरी अनेकांनी बांधलेल्या आडाख्यांप्रमाणे त्यांचा विजय ऐतिहासिक नाही, अशी टिप्पणी बीबीसी वृत्तवाहिनीने केली आहे. देशासमोरील आर्थिक संकटाचा सामना करण्यासाठी अर्थमंत्री राहिलेल्या सुनक यांनी करवाढीच्या योजना लागू केल्या होत्या. त्या मागे घेण्याचे वचन ट्रस यांनी दिले होते. त्यांच्या विजयात या आश्वासनानेच महत्त्वाची कामगिरी बजावल्याचे मानले जाते.
पक्ष सदस्यांची ट्रस यांना ८१,३२६, तर सुनक यांना ६०,३९९ मते मिळाली. या वेळी विक्रमी ८२.६ टक्के मतदान झाले. एकूण पात्र १७२,४३७ मतांपैकी ६५४ मते बाद झाली. याचा अर्थ ट्रस यांनी अगदी चांगल्या फरकाने विजय मिळवला.
पराभवानंतर सुनक यांनी लगेचच ट्वीट संदेशाद्वारे पक्षात एकजुटीची गरज व्यक्त केली. ‘‘मला मतदान करणाऱ्या प्रत्येकाचा मी आभारी आहे. निवडणुकीत हुजूर पक्ष हे एक कुटुंब आहे, यावर भर दिला होता,’’ असे सूचक विधान सुनक यांनी केले.
ट्रस यांनी विजयानंतर केलेल्या भाषणात देशावरील ऊर्जेचे संकट दूर करण्याची आणि नोकऱ्यानिर्मितीची ग्वाही दिली. ट्रस यांनी प्रतिस्पर्धी सुनक यांचे आभार मानले, तर मावळते पंतप्रधान जॉन्सन यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. ‘‘बोरिस तुम्ही ब्रेग्झिट प्रत्यक्षात करून दाखवले. तुम्ही विरोधी पक्षनेते जेरेमी कॉर्बीन यांच्यावर मात केली. तुम्ही करोना लस आणली आणि तुम्ही व्लादिमीर पुतिन यांच्या विरोधात उभे राहिलात. कीवपासून कार्लिसलपर्यंत तुमची प्रशंसा करण्यात आली,’’ असे ट्रस म्हणाल्या.
सुनक यांच्या पराभवाचे कारण..
सुनक हे मावळते पंतप्रधान जॉन्सन यांचे जवळचे मित्र. पंरतु पक्षांतर्गत नेतृत्वाच्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. सुनक यांनी अर्थमंत्री म्हणून लागू केलेल्या करयोजना मागे घेण्याची ग्वाही ट्रस यांनी दिली होती. हेच सुनक यांच्या पराभवामागील मुख्य कारण असल्याचे मानले जाते.
सध्याचा काळ देशासाठी कठीण असल्याने आणि लिझ ट्रस यांच्याकडे पंतप्रधानपदाची धुरा आल्याने त्यांच्या मागे आपण उभे राहिले पाहिजे.
–ऋषी सुनक, पराभूत उमेदवार
मतांची टक्केवारी अशी..
बोरिस जॉन्सन यांना २०१९ मध्ये ६६.४ टक्के मते मिळाली होती, तर २००५ मध्ये डेव्हीड कॅमरून यांना ६७.६ टक्के मते मिळाली होती. या दोघांच्या तुलनेत ट्रस यांना कमी (५७ टक्के) मते मिळाली आहेत.
देशावरील ऊर्जा संकट दूर करण्याबरोबरच अन्य दीर्घकालीन समस्यांचा सामना करून पंतप्रधानपद सार्थ ठरवेन.
– लिझ ट्रस, नवनिर्वाचित पंतप्रधान

Leave a Reply