संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत पुन्हा १४ दिवसांची वाढ

मुंबई : ५ सप्टेंबर – पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणात ईडीच्या अटकेत असलेले शिवसेनेचे फायरब्रँड नेते संजय राऊत यांना आज पुन्हा एकदा कोर्टाने झटका दिला आहे. राऊतांना आज जामीन मिळेल, अशी शक्यता असताना कोर्टाने पुन्हा एकदा त्यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ केली आहे. १९ सप्टेंबरपर्यंत त्यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्याचे निर्देश मुंबई सत्र न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे राऊतांना गणेशोत्सव तुरुंगातच घालवावा लागणार आहे.
संजय राऊत पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणात सध्या तुरुंगात आहेत. ३१ जुलै रोजी संजय राऊतांना ईडीने अटक केली होती. तेव्हापासून ते तुरुंगात आहेत. राऊतांना सुरुवातीला ८ दिवसांची ईडी कोठडी, मग २२ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी आणि नंतर १४ दिवसांची न्यायालयीन कोठडीतील वाढ… असे गेले ३५ दिवस राऊतांनी तुरुंगात काढले आहेत. आज राऊतांची न्यायालयीन कोठडी संपली होती. राऊतांना आज मुंबई सत्र न्यायालयात हजर केलं असता दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने राऊतांच्या न्यायालयीन कोठडीत १९ सप्टेंबरपर्यंत वाढ करण्याचे निर्देश दिले.
राज्यासह देशभरात गणेशोत्सवाची धूम सुरु असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबई दौऱ्यावर आले आहेत. काल (रविवारी) रात्री उशिरा त्यांचं मुंबईत आगमन झालंय. आज दिवसभर त्यांचे मुंबईत विविध कार्यक्रम आहेत. अमित शाह आज मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांच्या घरी बाप्पाच्या दर्शनाकरिता जाणार आहे. तत्पूर्वी ते लालबागच्या राजाची चरणीही लीन झाले. लालबागला जाण्याअगोदर ४० मिनिटे त्यांनी सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली. तिथून ते लागबागकडे जायला रवाना झाले. दुसरीकडे त्याच सुमारास शिवसेनेचे फायरब्रँड नेते संजय राऊत यांना कोर्टात हजर करण्यासाठी तुरुंगाबाहेर आणण्यात आलं. त्यावेळी ते माध्यमांच्या कॅमेरात कैद झाले. अमित शाह यांचा मुंबई दौरा आणि संजय राऊत यांच्या जेलबाहेरील फोटोंची सध्या चर्चा रंगते आहे.

Leave a Reply