तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव नितीश कुमार यांच्या भेटीसाठी बिहारला रवाना

पाटणा : ३१ ऑगस्ट – सध्या देशात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. बिहारमध्ये नितीश कुमार यांनी राजकीय भूकंप घडवत भाजपला धक्का दिला आहे. नितीश कुमार यांनी राष्ट्रीय जनता दलासोबत सरकार स्थापन केलं आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनं ही मोठी घडामोड मानली जात आहे. दरम्यान, आज तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव हे बिहारच्या दौऱ्यावर जाणार आहेत. ते मुख्यमंत्री नितीश कुमार यांची भेट घेऊन चर्चा करणार आहेत. या भेटीकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनं या भेटीमध्ये काही चर्चा होणार का राहणं देखील महत्वाचं ठरणार आहे.
2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी विरोधकांच्या हालचाली वाढल्या आहेत. भाजपविरोधात सर्व विरोधकांना एकत्र येण्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहेत. बिहारमध्ये नितीश कुमार यांनी भाजपशी असलेली युती तोडून राष्ट्रीय जनता दलासोबत घरोब केला. त्यानंतर 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून विरोधकांकडून नितीश कुमार यांच्या नाव पुढे आल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. आता तेलगंणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव हे नितीश कुमार यांची भेट घेणार असल्यानं या चर्चांना अधिक बळ मिळताना दिसत आहे. या भेटीचे अनेक राजकीय अर्थ काढले जात आहेत.
के चंद्रशेखर राव हे आज दुपारी नितीश कुमार यांच्या घरी जेवण करणार आहेत. यावेळी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्यासह महाआघाडीचे अनेक महत्त्वाचे नेते देखील उपस्थित राहणार आहेत. यावेळी विरोधकांची एकजूट आणि 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव करण्यावर चर्चा होणार असल्याची माहिती मिळत आहे. नितीश कुमार यांनी भाजपशी युती तोडल्यानंतर त्यांची सर्वत्र चर्चा होत आहे. दरम्यान, के चंद्रशेखर राव यांचा पक्ष तेलंगणापुरता मर्यादित असला तरी तो भाजपचा प्रमुख विरोधक आहे. के चंद्रशेखर राव यांनी सातत्यानं भाजपच्या विरोधात भूमिका घेतली आहे. ते भाजपच्या विरोधात विरोधकांची एकजूट करण्यात ते सतत आग्रही असतात. ते केवळ नितीशकुमार यांच्या संपर्कात आहेत, असे नाही. तर याआधी देखील त्यांनी भाजपच्या विरोधक असलेल्या पक्षांच्या नेत्यांच्या भेटी घेतल्या आहेतय यामध्ये पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममत बॅनर्जी, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीही त्यांनी भेट घेतली होती.

Leave a Reply