यवतमाळ : ३१ ऑगस्ट – शासनाकडून विविध उपाययोजना राबविल्यानंतरही दुष्काळाची झळ सोसणाऱ्या यवतमाळ जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांचे सत्र कमी होताना दिसत नाही. या वर्षी जुलै महिन्यात १८ तर ऑगस्ट महिन्यात ३८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. दोन महिन्यांत ५६ शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याने चिंता व्यक्त होत आहे. आर्थिक अडचणीत सापडलेला शेतकरी हवालदिल झाला आहे.
मागील तीन वर्षे दुष्काळात होरपळून निघालेल्या शेतकऱ्यांना यावर्षी चांगले पीक येईल अशी आशा होती; पण सततच्या अतिवृष्टीने व पुरामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. दुसरीकडे अद्याप शासकीय मदत मिळाली नसल्याने आर्थिकदृष्टीने खचलेले शेतकऱ्यांच्या आत्महत्या जिल्ह्यात वाढत आहे. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यावर राज्य शेतकरी आत्महत्यामुक्त करण्याची घोषणा केली होती. पण शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढतच आहेत. यवतमाळ जिल्ह्यात जुलै महिनात १८ शेतकरी आत्महत्या झाल्या. तर अतिवृष्टी व पुराचा फटका बसलेल्या ऑगस्ट महिन्यात दुप्पटीपेक्षा जास्त ३८ शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहे. दुर्दैवी बाब म्हणजे सर्वत्र पोळा सण साजरा होत असताना पोळ्याच्या तीन दिवसांत नऊ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. शेतकऱ्यांना तात्काळ मदतीची गरज असताना मदतीच्या केवळ घोषणा करण्यात येत आहे.
मारेगाव तालुक्यातील शिवणी येथील एका शेतकऱ्याने कीटकनाशक पिऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी घडली. हरिदास सूर्यभान टोनपे (वय ४८) असे शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांच्याकडे पाच एकर शेती होती. यावर्षी त्यांनी कापूस व तुरीची पेरणी केली होती. पण अतिवृष्टीने व पुरामुळे त्यांचे शेत खरडून निघाले. त्यामुळे पुन्हा पीक घेणे शक्य नसल्याने कुटुंबाचा खर्च कसा करावा या काळजीत ते होते. त्यांच्यावर बँकेचे व खाजगी कर्ज होते. मंगळवारी सकाळी त्यांची पत्नी शेतात कामाला गेली होती. मुले शाळेत गेले होते. हरिदास घरी एकटेच होते. त्यांनी कीटकनाशक प्यायले.