मध्यप्रदेशातील शाळेतील प्रभारी प्राचार्य आणि शिक्षिकेचा वाद सोशल मीडियावर व्हायरल

सागर : ३१ ऑगस्ट – मध्य प्रदेशच्या सागर जिल्ह्यातील सरकारी शाळेत प्रभारी प्राचार्य आणि महिला शिक्षिकेचा वाद झाला. दोघांनी एकमेकांना शिवीगाळ केली. प्रकरण चप्पल मारण्यापर्यंत पोहोचलं. या भांडणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. प्रकरणाची चौकशी करायला जिल्हा शिक्षण अधिकारी शाळेत पोहोचले. दोषींवर कारवाई करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं आहे.
देवरी विधानसभा क्षेत्रातील रसेना गावात हा संपूर्ण प्रकार घडला. उच्च माध्यमिकच्या वर्गातील विद्यार्थ्यांना शिकवण्यावरून प्रभारी प्राचार्य आणि शिक्षिकेचा वाद झाला. दोघांना एकाचवेळी विद्यार्थ्यांचा वर्ग घ्यायचा होता. त्यावरून दोघांचं भांडण झालं. त्याचा व्हिडीओ आता व्हायरल झाला आहे. त्यात महिला शिक्षिका विनीता धुर्वे प्राचार्य हरगोविंद जाटव यांना शिव्या देत असल्याचं दिसत आहे. धुर्वे जाटव यांना चप्पल मारतानाही दिसत आहेत.
हरगोविंद जाटव यांनी आधी शिवी दिल्याचा धुर्वे यांचा आरोप आहे. जाटव यांनी सर्वप्रथम शिवीगाळ केली. शिकवत असताना जबरदस्ती वर्गात घुसले आणि दोन्ही हात पकडून मला जमिनीवर पाडलं. त्यामुळे स्वसंरक्षणार्थ मी त्यांना चपलेनं मारलं, असं धुर्वे म्हणाल्या.
जाटव यांनी धुर्वे यांचे आरोप फेटाळून लावले. मॅडम ज्यावेळी वर्गात गेल्या, तो तास माझा होता. वेळापत्रकानुसार तो तास माझाच आहे. मी त्याचवेळी शिकवतो. मात्र मॅडमला मी जबरदस्ती वर्गात घुसत असल्याचं वाटलं. त्यामुळेच हा वाद झाला, असं जाटव म्हणाले. या प्रकरणाची चौकशी जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांकडून सुरू आहे.

Leave a Reply