बुथ लेव्हलपासून भाजपची बांधणी सुरू – चंद्रशेखर बावनकुळे

नागपूर : २९ ऑगस्ट – चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून त्यांनी राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघांवर लक्ष केंद्रीत केलं आहे. या सर्व मतदारसंघातून भाजपचे उमेदवार विजयी करण्यासाठी बावनकुळे यांनी जोरदार फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी बुथ लेव्हलपासून भाजपची बांधणी सुरू झाली आहे. एवढेच नव्हे तर काही केंद्रीय मंत्रीही महाराष्ट्रात दौरे करून संघटन बांधणीला बळ देणार आहेत. सप्टेंबरमध्ये भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबईच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यामुळे या दौऱ्याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे. भाजपने महाराष्ट्रातील सर्वच मतदारसंघांवर लक्ष केंद्रीतत केलं असलं तरी बारामतीवर खास लक्ष दिलं आहे. स्वत: चंद्रशेखर बावनकुळे बारामतीवर लक्ष ठेवून असल्याने शरद पवारांच्या बारामतीत भाजप चमत्कार घडवेल का? असा सवाल या निमित्ताने केला जात आहे.
महाराष्ट्रातील 16 लोकसभा मतदारसंघात 9 केंद्रीय मंत्री 6 वेळा प्रवास करणार आहेत. शिंदे आणि फडणवीस यांच्या नेतृत्त्वात आम्ही 48 मतदारसंघात काम करत आहोत. बारामती लोकसभा मतदारसंघात केंद्रीय मंत्री निर्मला सितारामण यांचा दौरा आहे. मी सुद्धा बारामती मतदारसंघात संघटन बांधणीचा दौरा करणार आहे, असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी मीडियाशी संवाद साधताना सांगितलं.
जयंत पाटील यांनी सत्तेत असल्याच्या मानसिकतेतून बाहेर यावं, काही दिवस आराम करावा. आता महाविकास आघाडीत धुसफूस आहे. ते जयंत पाटील यांनी पाहावं. राष्ट्रवादीत काय चाललं? याबाबत जयंत पाटील यांनी लक्ष द्यावं, असा सूचक इशाराही त्यांनी दिला.
राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांना राष्ट्रवादी प्रवेशाची ऑफर दिली आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. अमोल मिटकरी यांच्याबाबत काय बोलणार? त्यांना त्यांच्या पक्षाने काय अधिकार दिले? पंकजा मुंडे आमच्या मोठ्या नेत्या आहेत. त्या कधीही राष्ट्रवादीत जाण्याचा विचार करू शकत नाही. मिटकर यांच्या पक्षाचं पुढे काय होणार? याबाबत मिटकरी यांनी जयंत पाटील यांच्याशी बोलून घेतलं पाहिजे, असा इशाराही त्यांनी दिला.
फडणवीस सरकारमध्ये मंजूर झालेल्या कामांना स्टे दिला होता, ती कामं पुन्हा सुरु व्हावी. नागपूरच्या 45 विविध विषयांवर मी आज जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहे. नागपूरचे प्रश्न मार्गी लागले पाहिजे, असं ते म्हणाले.

Leave a Reply