गुलाम नबी आझाद नवीन पक्ष स्थापण्याच्या तयारीत

जम्मू : २८ ऑगस्ट – काँग्रेसची तब्बल पन्नास वर्षांची साथ शुक्रवारी सोडल्यानंतर ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद नवीन पक्ष स्थापण्याच्या तयारीत आहेत. येत्या पंधरवडय़ात जम्मू-काश्मीरमध्ये या पक्षाची शाखा कार्यान्वित होणार असल्याचे माहिती आझाद यांचे निकटवर्तीय व काँग्रेसचे जम्मू-काश्मीरचे माजी प्रदेश उपाध्यक्ष जी. एम. सरुरी यांनी शनिवारी दिली.
जम्मू-काश्मीरमध्ये ५ ऑगस्ट २०१९ पूर्वीची स्थिती पुन्हा आणणे, हे या नव्या पक्षाचे प्रमुख ध्येय असल्याचे सांगून सरुरी यांनी स्पष्ट केले, की आझाद हे धर्मनिरपेक्षतावादी आहेत. ते भाजपच्या तालावर नाचण्याचा किंवा भाजपची साथ देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. आझाद यांच्या राजीनाम्यानंतर जम्मू-काश्मीरच्या शेकडो काँग्रेस नेत्यांनी, पंचायत राज्य सदस्यांनी, प्रमुख कार्यकर्त्यांनी राजीनामा देत काँग्रेसत्याग केल्याचा दावाही सरुरी यांनी केला. ४ सप्टेंबरला आझाद जम्मू येथे येत आहेत. त्या वेळी ते नवीन पक्षाच्या स्थापनेआधी आपल्या समर्थक-शुभचिंतकांशी चर्चा करतील. राजीनामा दिल्यानंतर आझाद यांनी स्वत: नवीन पक्ष स्थापन करणार असल्याची घोषणा केली होती. त्याची जम्मू-काश्मीर शाखा लवकरच कार्यान्वित करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली होती.
आझाद यांच्या काँग्रेसत्यागामुळे जम्मू-काश्मीरमधून काँग्रेस जवळपास हद्दपार झाल्याचे सांगून सरुरी यांनी दावा केला, की आझाद यांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा देण्यासाठी जम्मू-काश्मीरच्या नेत्यांची रीघ लागली आहे. ग्रामपंचायत सदस्यांसह, जिल्हा आणि गटविकास समिती सदस्य व अनेक नगरसेवकांची शेकडो राजीनामापत्रे आम्हाला प्राप्त झाली आहेत. अनेक माजी मंत्र्यांसह नेत्यांनी-आमदारांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आझाद यांना पाठिंबा दिला आहे. यात जम्मू-काश्मीरचे उपमुख्यमंत्री तारा चंद यांचा समावेश असून, शनिवारी त्यांनी आझाद यांची दिल्लीत भेट घेतली आहे. ते काँग्रेसचा राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत.
आझाद भाजपशी सहयोग करत असल्याच्या काँग्रेसच्या आरोपाबाबत सरुरी म्हणाले, की आझाद यांच्यावर टीका करणारे एक तर वास्तवाकडे डोळेझाक करत आहेत अथवा आपल्या पायाखालची जमीन सरकत असल्याची जाणीव त्यांना झाली आहे.

Leave a Reply