हिंदू देवी-देवता उच्च जातीतून येत नाहीत, मग आपण हा भेदभाव करतो, हे अत्यंत अमानवीय – शांतीश्री धुलीपुडी

नवी दिल्ली : २३ ऑगस्ट – जवाहर लाल नेहरू विद्यापिठाच्या कुलगुरू शांतीश्री धुलीपुडी या सध्या चर्चेत आहे. केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने आयोजित केलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमालेत बोलताना त्यांनी केलेल्या एका वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. हिंदू देवी-देवता उच्च जातीतून येत नाहीत, असं वक्तव्य त्यांनी केलं आहे.
‘मानवशास्त्रीय व वैज्ञानिक दृष्टीकोनातून बघितल्यास हिंदूंचा एकही देव ब्राह्मण नाही. बरेचसे देव क्षत्रिय आहेत. भगवान शंकर हे अनुसूचित जातीचे किंवा अनुसूचित जमातीचे असावेत, असा माझा तर्क आहे. कारण ते एका स्मशानभूमीत सापासह बसले आहेत. ब्राह्मण स्मशानात बसू शकतील, असं मला वाटत नाही. त्यामुळे तुम्हाला स्पष्टपणे जाणवेल की मानवशास्त्रीयदृष्ट्या देव उच्च जातीतून आलेले नाहीत. मग आपण हा भेदभाव करतो. हे अत्यंत अमानवीय आहे,’ असं त्यांनी आपल्या भाषणात म्हटलं आहे.
मानवजातीच्या शास्त्रानुसार माता लक्ष्मी, शक्ती अगदी भगवान जगन्नाथही उच्च जातीतून आलेले नाहीत. भगवान जगन्नाथ हे खरे तर आदिवासी वंशाचे आहेत. मग आजही आपण हा भेदभाव का सुरू ठेवतोय जो अत्यंत अमानवी आहे. बाबासाहेबांच्या विचारांचा आपण पुनर्विचार करत आहोत हे फार महत्वाचे आहेत. हिंदू धर्म हा धर्म नाही, ती जीवनपद्धती आहे,’ असंही त्या म्हणाल्यात.
‘मनुस्मृतीत प्रत्येक महिलेला शुद्र म्हणून पाहिलं गेलं आहे. कोणतीही महिला ती ब्राह्मण असल्याचा दावा करु शकत नाही. लग्नानंतर महिलेला तिच्या पती किंवा वडिलांच्या जातीनुसार वर्गीकृत केलं जातं, असंही त्यांनी नमूद केलं आहे. राजस्थानमध्ये एका दलित मुलाची करण्यात आलेल्या हत्येवरुनही त्यांनी ताशेरे ओढले आहेत. पिण्याच्या पाण्यााला हात लावला म्हणून एका नऊ वर्षीय मुलाला बेदम मारहाण करण्यात आली. त्यातच त्याचा मृत्यू झाला. हा प्रकार अत्यंत अमानवीय होता. एक माणून एक दुसऱ्या माणसाशी असं कसं वागू शकतो?,’ असंही त्या म्हणाल्या आहेत.

‘भारतीय समाजाला प्रगती करायची असेल तर जाती निर्मूलन महत्त्वाचे आहे. मला समजत नाही की आपण आपल्या जातीबाबत इतके उत्कट का आहोत. ज्यामुळं भेदभाव आणि असमानता निर्माण होते. या तथाकथित कृत्रिमरित्या निर्माण केलेल्या ओळखीचे रक्षण करण्यासाठी आपण कोणालाही मारायला तयार आहोत,’ अशा शब्दांत त्यांनी राजस्थानच्या घटनेचा जाहीर निषेध केला आहे.
शांतीश्री धुलीपुडी या सध्या जेएनयूच्या कुलगुरु म्हणून कार्यरत आहेत. याआधी त्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात त्या प्राध्यापिका होत्या. शांतीश्री धुलीपुडी पंडित या पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या राजकारण आणि लोकप्रशासन विभागात प्राध्यापिका म्हणून कार्यरत होत्या. त्या जेअनयूच्या पहिल्या महिला कुलगुरू आहेत.

Leave a Reply