संपादकीय संवाद – फडणवीस पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवणार ही राजकीय वावडी

२०२४ साली होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजप नेते आणि विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पुणे लोकसभा क्षेत्रातून निवडणूक लढणार असल्याच्या चर्चेला राजकीय वर्तुळात अक्षरशः ऊत आला आहे. अखिल भारतीय ब्राम्हण महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी फडणवीसांनी लोकसभा पुण्यातून लढावी अशी मागणी केल्याने ही चर्चा सुरु झालेली आहे. एकूणच बाजारात तुरी अन भट भटणीला मारी असाच हा प्रकार आहे.
असे म्हणण्याला निश्चित कारणही आहेत, मुळात फडणवीसांनी आपण सध्या राज्याच्याच राजकारणात राहू असे स्पष्ट केले आहे. त्याच बरोबर पक्षश्रेष्ठींनीही फडणवीसांना राष्ट्रीय राजकारणात आणण्याबाबत काहीही सूतोवाच केलेले नाही, तरीही फडणवीस राष्ट्रीय राजकारणात जाणार असे अंदाज लावून लगेच ते पुण्यातूनच लढावे यासाठी कुणीतरी आग्रह धरणार आणि मग त्यावर चर्चा सुरु होणार, हा काहीसा बालिश प्रकारचं म्हणता येईल.
या सर्व चर्चेला सुरुवात होण्याचे कारण म्हणजे काही दिवसांपूर्वी पक्षश्रेष्ठींनी फडणवीसांना केंद्रीय निवडणूक समितीत सदस्य म्हणून दिलेली संधी. भाजप अध्यक्ष जे, पी. नड्डा यांनी फडणवीसांना या समितीवर घेतल्याची घोषणा केली आणि लगेचच चर्चांना उधाण आले, लगेच ब्राम्हण महासंघाने त्यांना पुण्यातून निवडणूक लढावी असा आग्रह देखील धरून टाकला. इथे फडणवीस काय म्हणतात हे कुणीही विचारले नाही, आज तर कहर झाला आहे, पुण्यातील भाजपचे विद्यमान खासदार गिरीश बापट यांनीही फडणवीस पुण्यातून लढल्यास माझी हरकत नाही असे विधान केल्याचे वृत्त माध्यमांवर दाखवले जात आहे.
देवेंद्र फडणवीस हे भारतीय जनता पक्षाचे एक कर्तृत्ववान नेते आहेत, अत्यंत लहान वयात त्यांनी मोठी झेप घेत आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे. त्यामुळे त्यांना सध्या संपूर्ण महाराष्ट्रात मागणी राहणारच, असे असले तरी त्यांची कर्मभूमी ही विदर्भ आणि त्यातही नागपूर ही राहिली आहे, हे बघता फडणवीस आजच राष्ट्रीय राजकारणात जाण्याची घाई करतील असे वाटत नाही, त्यातही निवडणूक लढायचीच झाली तर ते नागपूर विदर्भ सोडून पुण्यात जाणार नाही, हे नक्की. मात्र राजकारणात अश्या वावड्या उठवल्या जातात, २०१४ साली देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले, परिणामी संपूर्ण परिवारासह ते मुंबईत स्थानांतरित झाले, त्यानंतर २०१८ मध्ये फडणवीस हे आता त्यांचा मूळ मतदारसंघ दक्षिण पश्चिम नागपूर क्षेत्र सोडून मुंबईतून विधानसभा निवडणूक लढणार असल्याची जोरदार वावडी उठवली गेली होती, त्यावेळी आता दक्षिण पश्चिम मधून दुसरा आमदार कोण होणार? यावरही चर्चा सुरु झाल्या होत्या, अनेकांनी आपल्यालाच संधी मिळावी म्हणून देव पाण्यातही ठेवले होते, मात्र देवेन्द्रजी मुंबईला गेले नाहीत त्यांनी आपली नागपूरची नाळ तोडली नाही.
महाराष्ट्राचे धडाडीचे भाजप नेते म्हणून फडणवीसांनी आपले कर्तृत्व सिद्ध केलेले आहे, २०१४ पर्यंत जे कुणाला जमले नाही ते महाराष्ट्रात भाजपला विधानसभेत शंभरी गाठून देत मुंबईत भाजपचा मुख्यमंत्री बसवण्याचे कर्तृत्व त्यांनी दाखवले आहे. अर्थात अजूनही लढाई संपलेली नाही, महाराष्ट्रात भाजपला स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवून सत्ता मिळवायची आहे, हे लक्षात घेता फडणवीसांसारख्या तडफदार नेत्याची आज महाराष्ट्रात जास्त गरज आहे, याची जाणीव फडणवीसांनाही आहे. त्यामुळेच २०१९ मध्ये सत्ता गेल्यावर फडणवीसांना दिल्लीत नेणार अश्या चर्चा सुरु झाल्या होत्या तेव्हा महाराष्ट्रात भाजपचा मुख्यमंत्री बसवल्याशिवाय मी दिल्लीत जाणार नाही असे फडणवीसांनी स्पष्ट केले होते, आज महाराष्ट्रात जरी भाजपची सत्ता असली तरी मुख्यमंत्री भाजपचा नाही, त्यामुळे सध्यातरी फडणवीसांनी दिल्लीचा विचार करू नये, आणि इतरांनीही त्यांना दिल्लीला पाठवण्याची घाई करत नको त्या वावड्या उठवू नये, इतकेच सुचवावेसे वाटते.

अविनाश पाठक

Leave a Reply