रत्नागिरीत स्थानिकांनी अडवला निलेश राणेंचा ताफा, निलेश राणेंनी मागितली जाहीर माफी

रत्नागिरी : २१ ऑगस्ट – धोपेश्वर रिफायनरीच्या जागेची पाहणी करण्यासाठी गेलेल्या भाजप नेत्यांना रविवारी रत्नागिरीत स्थानिकांच्या रोषाचा सामना करावा लागला. यावेळी बारसू गावातील लोकांनी रस्त्यामध्ये ठिय्या देत निलेश राणे यांच्या गाड्यांचा ताफा अडवून धरला होता. त्यामुळे याठिकाणी काही काळ तणाव निर्माण झाला होता. निलेश राणे यांच्यासोबत असलेल्या काही लोकांनी ग्रामस्थांपैकी एकाला शिवीगाळ गेला. त्यामुळे बारसूचे गावकरी आणखीनच संतापले होते. अखेर निलेश राणे यांनी जाहीर माफी मागत या गावकऱ्यांचा रोष शांत करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर निलेश राणे यांनी ग्रामस्थांशी चर्चा केली. तुम्ही ठरवाल ती जागा आणि सांगाल त्यावेळी मी चर्चेला येण्यास तयार आहे. हा वाद चिघळून देऊ नका, या सगळ्यातून चर्चा करूनच मार्ग काढला पाहिजे, असे आवाहन निलेश राणे यांनी केले.
तत्पूर्वी रविवारी सकाळी निलेश राणे यांनी धोपेश्वर रिफायनरीच्या जागेची पाहणी केली. तेव्हा निलेश राणे यांनी प्रकल्पाचे समर्थन केले. काही मोजक्या लोकांचा अपवाद वगळता येथील बहुतांश जमीन मालकांना हा प्रकल्प व्हावा असे वाटते. त्यामुळे कोणीही उगाच विरोधाला विरोध करु नये, असेही निलेश राणे यांनी म्हटले. त्यानंतर निलेश राणे हे परतत असताना बारसू गावातील ग्रामस्थांनी त्यांच्या गाड्यांचा ताफा अडवून धरला. यावेळी ग्रामस्थांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या आंदोलकांमध्ये महिलांचा सहभाग लक्षणीय होता. या महिलांनी निलेश राणे यांना आक्रमकपणे अनेक सवाल विचारले. त्यावर निलेश राणे यांनी त्यांना जमेल तितकी उत्तरे देण्याचा प्रयत्न केला.
यावेळी संतप्त ग्रामस्थांनी निलेश राणे यांच्या लोकांनी आम्हाला शिवीगाळ केल्याचे म्हटले. त्यावर निलेश राणे यांनी सर्वांची माफी मागितली. तसेच राज्य सरकार कोणासोबत दुजाभाव करणार नाही. आपण या सगळ्यातून चर्चा करून मार्ग काढू. हा प्रकल्प माझा खासगी प्रकल्प नाही, तर सरकारचा आहे. तुम्ही सरकारशी चर्चाच केली नाही तर या सगळ्यातून मार्ग कसा निघणार, असा सवाल निलेश राणे यांनी ग्रामस्थांना केला. मात्र, निलेश राणे यांच्या या उत्तरानंतरही ग्रामस्थांचे फारसे समाधान झाले नव्हते. आम्ही कोणत्याही परिस्थितीत आमच्या जमिनी देणार नाही, अशी भूमिका बारसूच्या ग्रामस्थांनी घेतली. मात्र, ग्रामस्थांनी निलेश राणे यांच्या गाड्यांच्या ताफ्याला मोकळी वाट करून दिली. त्यानंतर गाड्यांचा ताफा पुढच्या दिशेने मार्गस्थ झाला.

Leave a Reply