उद्धव ठाकरेंना इगो नव्हता, तर इगो फडणवीस यांनाच – सुनील राऊत

मुंबई : १२ ऑगस्ट – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या इगोमुळेच कांजूर मार्गमध्ये मेट्रोची कारशेड केली जात होती, अशी टीका राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. फडणवीस यांच्या या आरोपाला शिवसेनेचे आमदार सुनील राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं. उद्धव ठाकरेंना इगो नव्हता. तर इगो फडणवीस यांनाच आहे, अशी टीका सुनील राऊत यांनी केली. इगो उद्धव साहेबांचा नाही. हा इगो त्यांचा आहे. उद्धव साहेबांनी खूप चांगला डिसिजन घेतला होता. झाडे कापून चालणार नाही. मुंबईमध्ये झाडे कमी, इमारती जास्त आहेत. त्यामुळे आरेमधील झाडे वाचवणे आवश्यक आहे. कारण एक झाड म्हणजे एक जीव आहे. म्हणून हजारो झाडे कापण्यापेक्षा कांजूरमार्गमधील जमीन पडलेली आहे. हा सरकारी भूखंड आहे. त्यामुळे तिथेच कारशेड व्हावी. त्यामुळे आरेतील झाडांची कत्तल होणार नाही. परिणामी मुंबईकरांसाठी एक चांगलं जंगलही मिळेल, असं सांगतानाच हा इगो उद्धव साहेबांचा नव्हे तर हा इगो त्यांचा आहे. म्हणूनच उद्धव साहेबांनी घेतलेले डिसिजन चेंज करून त्या झाडांचा आता जीव घेतला जात आहे, अशी टीका राऊत यांनी केली.
सुनील राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना ही टीका केली. दहीहंडीमध्ये जे थर लागतात, जमिनीवरती उभ्या असलेल्या बेसवर वरचे थर कोसळत असतात. परंतु खालचा तर कधी कोसळत नाही. कारण हा बेस शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी बनवलेला आहे. त्यामुळे वरचा थर बनवत असतो आणि कोसळत असतो. शिवसेनेचा बेस आणि थर मजबूत आहे, असं सुनील राऊत यांनी सांगितलं
सुनील राऊत यांनी कालच्या मंत्रिमंडळाच्या विस्तारावरही टीका केली होती. या मंत्र्यांनी शपथ घेतली यावेळी कोणीही बाळासाहेबांचे नाव घेतले नाही व साधा उल्लेख देखील केला नाही. जर त्यांना खरे प्रेम असते तर त्यांनी बाळासाहेबांच्या नावाचा उल्लेख केला असता. आम्ही आज बाळासाहेबांना उद्धव ठाकरेंच्या रूपात बघतो. त्यांना शिवसेना आणि बाळासाहेबांबद्दल एवढीच आस्था असती तर शिवसेनेत फूट पाडून ते बाहेर गेले नसते. तसेच त्यांना वर्षावरून खाली करायला लावले नसते. ही कसली निष्ठा? हे सगळे बोगस प्रेम आहे. हे उसनं दाखवलेले प्रेम आहे. त्यांचं प्रेम बोगस आहे हे जनतेलाही माहीत आहे, असं ते म्हणाले होते.

Leave a Reply