जालन्यात आयकर विभागाच्या धाडीत ३९० कोटींची बेहिशेबी मालमत्ता जप्त

जालना : ११ ऑगस्ट – मराठवाड्यात जालन्यात आयकर विभागाने 5 व्यापारी समुहांवर मारलेल्या धाडीत 390 कोटींची बेहिशोबी मालमत्ता जप्त केली आहे. या छाप्यात 58 कोटी रुपयांची कॅश, 32 किलो सोन्याचे दागिने, 16 कोटी रुपयांचे हिरे, मोती जप्त करण्यात आले आहेत. ही सगळी रोख रक्कम मोजण्यासाठी आयकर विभागाला तब्बल 13 तास लागले. काही कर्मचाऱ्यांची ही कॅश मोजताना तब्येत बिघडल्याचीही माहिती आहे. आयकर विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन स्टील कंपन्या, एक सहकारी बँक, एक फायनान्सर, एक डीलर यांची फॅक्टरी, घर आणि कार्यालय या सगळ्या ठिकाणी 1ते 7 ऑगस्ट अशी आठवडाभर ही कारवाई सुरु होती. याची माहिती गुरुवारी माध्यमांना देण्यात आली. आयकर विभागाची टीम वराती म्हणून शहरात आले होते.
आयकर विभागांच्या गाड्यांवर लग्नांचे स्टीकर्स चिटकवण्यात आले होते. काही गाड्यांवर लिहलेले होते – दुल्हनिया हम ले जायेंगे, हाच या सगळ्यांचा कोडवर्ड होता. या कारवाईत आयकर विभागाचे 260अधिकारी आणि कर्मचारी सहभागी होते, सुमारे 120 गाड्या या सगळ्यांसाठी तैनात होत्या. हे सगळे ऑपरेशन पाच वेगवेगळ्या टीमने पार पाडले. यात मोठ्या प्रमाणात करचोरी करण्यात आल्याचा आयकर विभागाला संशय आहे.
आयकर विभागाच्या सुरुवातीच्या तपासात त्यांच्या हाती फारसे काही लागले नव्हते. मात्र नंतर जालन्यापासून 10 किलोमीटर अंतरावर असलेल्या एका फार्महाऊसवर छापा घालण्यात आला. या फार्महाऊसमध्ये एका कपाटाच्या खाली, बेडमध्ये आणि इतर काही कपाटांमध्ये पैशांची बंडले सापडली. या सगळ्या नोटा स्टेट बँक ऑफ इंडियाच्या स्थानिक शाखेत जाऊन मोजण्यात आल्या. या मोजण्यासाठी 10 ते 12नोटा मोजण्याच्या मशीन होत्या. कपड्यांच्या मोठ्या 35 पिशव्यांत ही सगळी रक्कम आणण्यात आली होती.
या छाप्याबाबत आयकर विभागाकडून मोठी गुप्तता पाळण्यात आली होती. त्यासाठी मोठी सावधगिरीही बाळगण्यात आली होती. टीमने आपआपल्या गाड्यांवर वर आणि वधुच्या नावांची स्टीकर्स लावली होती. यामुळे या गाड्या कोणत्यातरी लग्नाला निघाल्या असल्याचा भास निर्माण होत होता. या ऑपरेशनच्या काळात दुल्हनिया हम ले जायेंगे या कोडवर्डमध्ये सगळे एकमेकांशी संवाद साधत होते.

Leave a Reply