भावना गवळी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बांधली राखी

नवी दिल्ली : ११ ऑगस्ट – काही दिवसांपूर्वी आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीच्या कचाट्यात सापडलेल्या खासदार भावना गवळी यांनी गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत रक्षाबंधनाचा सण साजरा केला. भावना गवळी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राखी बांधली. त्यांनी आपल्या फेसबुकवर पोस्ट टाकून याबाबतची माहिती दिली. अनेक वर्षापासून पवित्र रक्षाबंधनाच्या दिवशी मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांना छोटी बहिण या नात्याने मी राखी बांधत आलेली आहे. आज दिनांक 11/08/2022 रोजी मा पंतप्रधान महोदयांना राखी बांधण्याचे भाग्य प्राप्त झाले. यावेळी कौटुंबिक विचारपूसेसह मतदासंघांच्या अनेक विकासात्मक विषयावर चर्चा झाली, असे भावना गवळी यांनी या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे.
मात्र, सोशल मीडियावर भावना गवळी यांच्या या पोस्टची एका वेगळ्याच कारणामुळे चर्चा रंगली आहे. काही दिवसांपूर्वीच भावना गवळी यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली होती. त्या शिवसेनेच्या इतर १२ आमदारांसोबत एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाल्या होत्या. गेल्या अडीच वर्षांच्या काळात आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात भावना गवळी यांच्यापाठी ‘ईडी’चा ससेमिरा लागला होता. त्यांच्या एका निकटवर्तीयाला ईडीकडून अटकही करण्यात आली होती. मात्र, शिंदे गटाने भाजपसोबत राज्यात सत्तास्थापन केल्यानंतर भावना गवळी यांच्यापाठी लागलेली ‘ईडी-पीडा’ दूर होईल, अशी चर्चा होती. अशातच इतके दिवस केंद्रीय यंत्रणेच्या रडारवर असलेल्या भावना गवळी रक्षाबंधनाच्या दिवशी थेट पंतप्रधान मोदी यांनी राखी बांधायला पोहोचल्या. त्यामुळे आता भावना गवळी यांच्यापाठी लागलेले ईडीचं सावट दूर होणार का, याविषयी चर्चांना उत आला आहे.
खासदार भावना गवळी यांच्या बालाजी पार्टिकल बोर्ड कारखान्यात १०० कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणात ईडीनं गवळी यांच्याशी संबंधित असलेल्या यवतमाळ व वाशिम येथील पाच संस्थांवर याआधीच छापे टाकले होते. वाशिम-यवतमाळ येथे टाकलेल्या छाप्यांमध्ये ईडीने येथून अनेक कागदपत्रे जप्त केली होती. भावना गवळीशी संबंधित पाच संस्थांच्या अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्यात आली होती. याच प्रकरणात सप्टेंबरमध्ये सईद खान यांना अटक करण्यात आली होती. मात्र, काही दिवसांपूर्वीच सईद खान यांना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला होता.

Leave a Reply