आम्हाला शरम वाटते पण तुम्हाला का नाही वाटत – पूजा चव्हाण यांच्या आजीचा संताप

बीड : १० ऑगस्ट – संजय राठोड जगभरात निर्दोष असल्याचं दाखवतात, मात्र ते जनतेच्या नजरेत निर्दोष नाहीत. एका पक्षानं राठोड यांना वाचावलं, तर दुसरा पक्ष त्यांना मंत्रिमंडळात स्थान देतोय, हे बरोबर नाही. पूजा चव्हाणला न्याय मिळेपर्यंत आम्ही शांत बसणार नाहीत, असं वक्तव्य पूजा चव्हाणची आजी शांताबाई राठोड यांनी केलंय. बीड जिल्ह्यातील तरुणी पूजा चव्हाण हिच्या आत्महत्या प्रकरणी आमदार संजय राठोड हे दोषी असल्याचा आरोप आहे. राठोड हे मविआ सरकारमध्ये वनमंत्री असतानाच हे आरोप झाले होते. तत्कालीन विरोधी पक्ष भाजपने राठोडांविरोधात टीकेची झोड उठवली होती. मात्र आता शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर त्याच संजय राठोड यांना मंत्रिपदात स्थान देण्यात आल्याने विरोधकांनी जोरदार टीका सुरु केली आहे. पूजा चव्हाणच्या आजीनेही यावर संतप्त प्रतिक्रिया दिली.
परळी येथील रहिवासी- पूजा चव्हाणच्या आजी शांतबाई राठोड म्हणाल्या, ‘ पूजाला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत शांत बसणार नाही. शिंदे सरकार मध्ये पूजाला न्याय मिळेल अशी अपेक्षा होती, मात्र तसे झाले नाही. पोलिसांनी क्लीन चीट दिली. मात्र पोलीस तुमचेच आहे, त्यामुळे तुम्ही क्लीन चिट देणारच.. एक खुनी माणूस या सरकारमध्ये नेतृत्व करत आहे.. आम्हाला शरम वाटते पण तुम्हाला का नाही वाटत.. एक पूजा नाही तर अशा लाखो पूजा चव्हाणचा बळी घेत आहे.. तो मंत्री असो की संत्री असो.. पूजाला न्याय मिळाल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाहीत. शेवटच्या क्षणापर्यंत आमचा लढा असाच सुरू राहिल. जिथं न्याय मागायला गेलो, तोच गळा दाबायला निघालाय.. अशा भावना शांताबाई राठोड यांनी बोलून दाखवल्या…
काय आहे नेमकं प्रकरण?
संजय राठोड हे यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस विधानसभा मतदार संघाचे आमदार आहेत. बंजारा समाजाचे ते आक्रमक नेते आहेत. मूळची बीड येथील परळीमधील रहिवासी असलेली 22 वर्षीय पूजा चव्हाण ही तरुणी 2021 च्या फेब्रुवारी महिन्यात पुण्यात आली होती. 9 फेब्रुवारी रोजी मध्यरात्री पुण्यातील घराच्या गॅलरीतून पडून तिचा मृत्यू झाला. पूजाच्या मृत्यूनंतर दोन ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या होत्या. त्यातील संवादांमुळे पूजाने आत्महत्या केली असून याचा संबंध तत्कालीन ठाकरे सरकारमधील वनमंत्री संजय राठोड यांच्याशी असल्याचा आरोप भाजपने केला. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली. पूजाच्या आई-वडिलांनी कर्जापायी तिने आत्महत्या केल्याचे म्हटले, मात्र ते दबावाखाली असल्याचा आरोप भाजपने केला. त्यानंतर पुण्यातील वनवडी पोलिसांमार्फत या प्रकरणाची चौकशी करण्यात आली आणि राठोड यांना क्लिन चीट देण्यात आली. राठोड यांना पुन्हा मंत्रिपद देण्याची मागणी ठाकरे सरकारमध्येच जोर धरत होती. ठाकरे सरकार राठोडांना पाठिशी घालतंय, असेही आरोप होत होते. मात्र शिंदे आणि फडणवीसांच्या सरकारमध्येही संजय राठोडांना पुन्हा एखदा मंत्रिपद देण्यात आलंय. त्यामुळे चित्रा वाघांसहित अनेक विरोधी पक्ष नेत्यांनीही संजय राठोड यांच्या मंत्रिपदावरून टीकेची झोड उठवली आहे.

Leave a Reply