सख्या मेव्हण्यांनी बेदम मारहाण करून जावयाचा घेतला जीव

गडचिरोली : १० ऑगस्ट – जावयासोबत झालेल्या भांडणात दोन सख्या मेव्हण्यांनी बेदम मारहाण करून जिवे मारले. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी त्याच्या दुचाकी वाहनाला मृतदेह बांधून नदीत ढकलले. एखाद्या चित्रपटात शोभेल, असा हा प्रसंग एटापल्ली तालुक्यातील एकरा टोला या गावात २२ जुलै रोजी घडला. तब्बल पंधरा दिवसांनी या घटनेचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे.
दिलीप राजू बारसा (२४ वर्षे) असे मृतकाचे नाव असून टोयोटापल्ली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तोडसा ग्रामपंचायतमधील आलेंगा येथील रहिवासी होता. तर केशव पांडू मठ्ठामी (३० वर्षे) आणि बालाजी पांडू मठ्ठामी (३५ वर्षे) दोघेही राहणार एकरा टोला अशी हत्या करणाऱ्या आरोपी मेव्हण्यांची नावे आहेत.
पोलिसांकडून दिलेल्या माहितीनुसार, तीन वर्षांपूर्वी लग्न झाले होते. त्यांना लहान मुलगी आहे. परंतु, सतत कौटुंबिक वाद सुरू असायचे. एक राठोडा व आलंगा या गावांचे अंतर दहा किलोमीटर आहे. त्यामुळे दोन्ही कुटुंबांचे एकमेकांच्या घरी नेहमी येणे-जाणे सुरू असायचे. २२ जुलैला दोन्ही मेव्हणे आणि त्यांचे जावई यांच्यात भांडण झाले. त्यामुळे दोघांनी मिळून जावयाची बेदम पिटाई केली. या मारहाणीत जावई दिलीप बारसा गंभीर जखमी झाले. पण त्यांना दवाखान्यात न आणता दोन्ही भावांनी त्यांना जीवे मारून टाकले आणि पुरावा नष्ट करण्यासाठी एकरा टोला गावाजवळील बांधे नदीच्या पात्रात दुचाकीला मृतदेह बांधून नदीत ढकलले.
ही घटना घडली त्यावेळी जोरदार पाऊस सुरू होता. त्यामुळे मृतदेह दुचाकीसह नदीत वाहून गेला असा देखावा करता येईल, अशी दोन्ही मेव्हण्यांची योजना होती. इकडे २२ जुलैपासून दिलीप दिसत नसल्यामुळे घरच्यांनी आठ दिवस दिलीपची शोधाशोध केली. अखेर कुठेच सापडत नसल्याने दिलीपच्या वडिलांनी ३० जुलैला पोलीस ठाण्यात दिलीप बेपत्ता असल्याची माहिती दिली.
ठाणेदार विजयानंद पाटील यांनी कौटुंबिक माहिती घेतली. दोन्ही कुटुंबातील सर्व सदस्यांचे वेगवेगळे बयान घेतले. गावकऱ्यांकडूनही माहिती घेतली. यात पाटील यांना दिलीपचे दोन्ही मेव्हणे केशव व बालाजी यांच्यावर शंका आली. त्यांना पोलिसी खाक्या दाखविताच दोघांनीही अखेर हत्येची कबुली दिली. त्यांच्यावर आता हत्येचा गुन्हा दाखल केला असून, दोघेही सध्या पोलीस कोठडीत आहेत.
आरोपींनी दिलेल्या माहितीनुसार, बांदे नदीच्या पात्रात मृतदेह आणि दुचाकीचा शोध घेण्यात आला. मृतदेह गाडीला बांधून ठेवल्याने तो जास्त दूर वाहत जाणार नाही, याची कल्पना होती. त्यानुसार नदीतून दुचाकी आणि मृतदेहाचा शिल्लक राहिलेला हाडांचा सापळा पोलिसांच्या हाती लागला.

Leave a Reply