ज्यांनी आम्हाला धोका दिला त्यांचाच पक्ष आम्ही फोडला – सुशील मोदी

पाटणा : १० ऑगस्ट – महाराष्ट्रानंतर बिहारमध्येही राजकीय भूकंप होऊन सत्तांतर झालं आहे. मात्र, सत्तांतरानंतर महाराष्ट्रात भाजपा सत्तेत आली आहे, मात्र बिहारमध्ये भाजपाला सत्तेबाहेर जावं लागलंय. त्यामुळे बिहार भाजपाचे नेते व माजी उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांनी संयुक्त जनता दलाचे प्रमुख नितीशकुमार यांना त्यांचं राष्ट्रीय जनता दल व काँग्रेससोबतच सरकार कोसळणार आहे आणि तेही २०२५ पूर्वीच कोसळेल, असा इशारा दिला आहे.
सुशील मोदी म्हणाले, “संयुक्त जनता दल, राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेस यांनी कितीही ताकद लावली तरी ते मोदींना २०२४ मध्ये पंतप्रधान बनण्यापासून रोखू शकणार नाही. आम्ही बिहारमध्ये प्रचंड बहुमताने पुन्हा सत्तेत येऊ. आज लिहून ठेवा, हे सरकार २०२५ वर्षही पूर्ण करू शकणार नाही. त्याआधीच हे सरकार कोसळेल.”
“अमित शाहांनी फोन केला तेव्हा त्यांनी आरसीपी सिंह यांचं नाव दिलं. त्यानंतर सिंह यांना मंत्री करण्यात आलं. नितीशकुमार यांच्या संयुक्त जनता दल पक्षाचा कोणता नेता मंत्री होतो यामुळे भाजापाला काहीही फरक पडत नाही. भाजपाने नितीश कुमार यांना जेवढा सन्मान दिला तेवढा सन्मान त्यांना राजद, काँग्रेससोबत मिळू शकणार नाही. १९९६ पासून पाहिलं तर, अटलबिहारी वाजपेयी असो किंवा नरेंद्र मोदींचं सरकार असो, भाजपाने त्यांना सन्मान दिला. त्या सन्मानालाच त्यांनी धोका दिला,” असा आरोप मोदींनी केला.
पक्ष फोडीच्या आरोपावर सुशील मोदी म्हणाले, “नितीश कुमार म्हणतात आमच्या पक्षाला फोडण्याचा प्रयत्न होत होता. मात्र, आम्हाला सरकार स्थापन करण्यासाठी ४० आमदार हवे आहेत. त्यांच्या पक्षाला भाजपाने फोडलं असतं तरी सरकार स्थापन झालं असतं का? आम्ही का त्यांचा पक्ष फोडू? त्यांच्या ४४-४५ आमदार होते तेव्हा आम्ही त्यांना मुख्यमंत्री केलं. आम्हाला काही करायचं असतं तर आम्ही तेव्हाच फोडाफोड केली असती. मात्र, भाजपाने कधीही आपल्या मित्रपक्षाला धोका दिलेला नाही. ज्यांनी आम्हाला धोका दिला त्यांचाच पक्ष आम्ही फोडला.”
महाराष्ट्रात शिवसेनेची भाजपासोबत युती होती. मात्र, त्यानंतर शिवसेनेने धोका दिल्याने त्यांना त्याचा परिणाम भोगावा लागला. राजद, काँग्रेस, जेडीयू पक्ष एकत्र आले तर लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींना पराभूत करू असा तिन्ही पक्षांचा गैरसमज आहे. ते हे विसरत आहेत की नरेंद्र मोदींची लोकप्रियता २०१४, २०१९ पेक्षाही अनेकपट जास्त आहे,” असंही मोदींनी नमूद केलं.

Leave a Reply