महाराष्ट्रातील नवनिर्वाचित मंत्र्यांना पंतप्रधानांच्या मराठीत शुभेच्छा

नवी दिल्ली : ९ ऑगस्ट – गेल्या महिन्याभरापासून प्रलंबित असलेला राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार अखेर पार पडला आहे. राजभवनावर हा शपथविधी पार पडला. पहिल्या टप्प्यात शिंदे गट आणि भाजपाकडून प्रत्येकी नऊ अशा एकूण १८ मंत्र्यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. दरम्यान, या शपथविधीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवनिर्वाचित मंत्र्यांना ट्वीटद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत.
“महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्री म्हणून आज ज्यांनी शपथ घेतली, त्या सर्वांचे अभिनंदन. प्रशासकीय अनुभव आणि सुशासनाने कारभार करण्याचा ध्यास असलेल्या व्यक्ती यांचा मिलाफ असलेली ही उत्तम टीम आहे. राज्याच्या जनतेची सेवा करण्यासाठी त्यांना माझ्याकडून शुभेच्छा”, असे ट्वीट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.
नुकताच शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार पार पडला. यावेळी पहिल्या टप्प्यात शिंदे गट आणि भाजपाकडून प्रत्येकी नऊ अशा एकूण १८ मंत्र्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. शिंदे गटाकडून तानाजी सावंत, उदय सामंत, संदीपान भुमरे, दादा भुसे, अब्दुल सत्तार, दीपक केसरकर, शंभूराज देसाई, संजय राठोड, गुलाबराव पाटील यांना मंत्रिमंडळात स्थान मिळालं आहे. तर भाजपाकडून गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, सुरेश खाडे, राधाकृष्ण विखे पाटील, अतुल सावे, रवींद्र चव्हाण, विजयकुमार गावित, मंगलप्रभात लोढा यांना संधी देण्यात आली आहे. संजय राठोड यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. तर दुसरीकडे एकाही महिला नेत्याला संधी न देण्यात आल्याने सरकारवर टीका होत आहे.

Leave a Reply