नागपुरात विमानाशेजारी पडली वीज, दोन अभियंते जखमी

नागपूर : ७ ऑगस्ट – डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर उभे असलेल्या इंडिगो एअरलाइन्सच्या विमानाशेजारी वीज पडली. यामुळे विमानाचे नुकसान झाले नाही. परंतु, विमानाची फिटनेस चाचणी करणारे दोन अभियंते जखमी झाले. अमित आंबटकर (वय २८) आणि ऋषी सिंग (वय ३३) अशी जखमी झालेल्या अभियंत्यांची नावे असून त्यांच्यावर किंग्जवे रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
शनिवारी सायंकाळी काही वेळेसाठी झालेल्या पावसाने चांगलेच थैमान घातले. वीजांचा कडकडाट आणि धुव्वाधार पाऊस सुरू होता. यादरम्यान ही घटना घडली. इंडिगोचे विमान नागपूरहून लखनौसाठी उड्डाण घेण्याच्या तयारीत होते. तत्पूर्वी, विमानाची फिटनेस तपासणी सुरू होती. आंबटकर आणि सिंग हे दोघेही त्या कामावर होते. तपासणी सुरू असताना विमानाशेजारी वीज पडल्याचा प्रकार घडला. त्यामुळे दोन्ही अभियंत्यांना जोरदार झटका बसला. त्यातील आंबटकर हा तीन ते चार मिनिटांसाठी बेशुद्ध होता. तर सिंगचा उजवा हात काही वेळासाठी निकामी झाला होता.
दोघांनाही तात्काळ रुग्णालयात भरती करण्यात आले. तेथील डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघांचीही प्रकृती चांगली आहे. तरीदेखील काळजीपोटी त्यांना वैद्यकीय देखभालीत चोवीस तास ठेवण्यात येणार आहे. या संपूर्ण घटनेत विमानाचे काहीही नुकसान झाले नाही. इंडिगोने प्रवाशांची सुरक्षा लक्षात घेत विमानाची संपूर्ण तपासणी केली. त्यानंतरच विमान लखनौच्या दिशेने उडाले. विशेष म्हणजे वीज पडुनही विमान उभे असलेल्या पार्किंगस्थळाचेही नुकसान झाले नसल्याचे विमानतळ व्यवस्थापनाद्वारे स्पष्ट करण्यात आले.
रोज आकाशात लाखो विमाने उड्डाण घेतात. त्यांच्यावर वीज पडणे ही अतिशय सामान्य बाब आहे. पारंपरिकरीत्या विमानाच्या बांधणीसाठी अल्युमिनिअमचा वापर करतात. त्यामुळे वीज पडली तरी विमानाचे नुकसान होत नाही. विमानाचा वरचा थर हा एखाद्या सुरक्षित कवच असल्यासारखे काम करतो. आता जी नवीन विमाने बनत आहेत, ती कार्बन फायबरसारख्या हलक्या मटेरिअलपासून तयार होतात. या मटेरिअलमधील विजेची सुवाहकता तुलनेने कमी असते. पण कार्बन फायबरला अनेकदा धातूच्या जाळीचा किंवा फॉईलचा आधार लागतो. तसेच विमानात असलेल्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे तसेच इंधनाच्या टाकीचे कुठल्याही तारांपासून रक्षण केले जाते. यामुळे वीज पडली तरी धोका निर्माण होत नाही.

Leave a Reply