भंडाऱ्यातील सामूहिक अत्याचार प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून दोषींवर तत्काळ कारवाई – एकनाथ शिंदे

मुंबई : ७ ऑगस्ट – भंडाऱ्यात निर्वस्त्र आढळलेल्या महिलेवर सामूहिक अत्याचार झाल्याच्या घटनेचे महाराष्ट्रात तीव्र पडसाद उमटले आहेत. या प्रकरणी सर्वच राजकीय पक्षांनी भूमिका घेत पीडितेला मदत आणि दोषींवर तातडीने कारवाईची मागणी केलीय. या पार्श्वभूमीवर दिल्ली दौऱ्यावर असणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही प्रतिक्रिया दिली. “हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालेल. तसेच दोषींवर तात्काळ कठोर कारवाई होईल,” अशी माहिती एकनाथ शिंदेंनी दिली.
एकनाथ शिंदे म्हणाले, “भंडारा जिल्ह्यातील अत्याचाराचा प्रकार अतिशय दुर्दैवी, निंदनीय आहे. याविषयी मी स्वतः पोलीस महानिरिक्षकांशी बोललो आहे. पीडित महिलेच्या प्रकृतीची काळजी घेण्याबाबत डॉक्टरांना सूचना दिल्या आहेत.”
गुन्हेगारांना कठोर शासन व्हावं यासाठी महिला आयपीएस अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक नेमण्यात आलं आहे. हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालेल. तसेच दोषींवर तात्काळ कठोर कारवाई होईल,” अशी माहिती एकनाथ शिंदेंनी दिली.
दिल्लीतील बैठकीविषय बोलताना शिंदे म्हणाले, “मी नीती आयोगाच्या बैठकीला जात आहे. या बैठकीत राज्याचे प्रश्न सोडवण्याची आणि प्रकल्प पुढे नेण्याची संधी मिळते. तसेच राज्याने केलेली कामं मांडण्याचीही संधी मिळते. नीती आयोगाच्या बैठकीतून केंद्र शासनाची मदतही मिळते.”
नीलम गोऱ्हे म्हणाल्या, “भंडारा बलात्कारप्रकरणात पीडितेवर मदत करतो म्हणून पुन्हा निर्घृण अत्याचार झाले. शेवटी १ ऑगस्टला पीडिता गोंदिया आणि भंडारा जिल्ह्याच्या सीमावर्ती गावात पूर्णपणे विवस्त्र अवस्थेत सापडली. त्यानंतर गावकऱ्यांनी पीडितेला कपडे देऊन पोलिसांना याची माहिती दिली. मला शुक्रवारी (५ ऑगस्ट) माध्यमांमधून या घटनेची माहिती मिळाली. घटना १ ऑगस्टला समोर आल्यानंतरही ४ ऑगस्टनंतर याबाबत हालचाली झाल्या.”
“मी पोलीस महानिरिक्षकांशी बोलले आहे. पीडितेच्या कुटुंबियांशी बोलले. या प्रकरणात अद्यापही एक आरोपी सापडलेला नाही. पीडितेचं कुटुंब फार गरीब आहे. दिल्लीतील निर्णयाप्रमाणेच ही घटना आहे. तिच्यावर पाच शस्त्रक्रिया कराव्या लागणार आहेत. त्यातील एक शस्त्रक्रिया झालीय. एकदम सर्व शस्त्रक्रिया करता येत नाही. शरीराची प्रतिकारशक्ती वाढवून मग एकामागोमाग शस्त्रक्रिया होणार आहे,” अशी माहिती नीलम गोऱ्हेंनी दिली.

Leave a Reply