सरकारी खजिन्यावर पहिला हक्क कुणाचा? – वरूण गांधींचा स्वपक्षीयांना टोला

नवी दिल्ली : ७ ऑगस्ट – निवडणुकीत मते मिळवण्यासाठी मोफत ‘रेवडी’ वाटपावर पंतप्रधान नरेंद्र मोंदी यांनी नुकतीच टीका झाली होती. यासंदर्भात भाजपचे खासदार वरुण गांधी यांनी शनिवारी आपल्या सरकारलाच ‘घरचा आहेर’ दिला. त्यांनी हिंदीत ‘ट्वीट’ केले, की गेल्या पाच वर्षांत भ्रष्टाचारी उद्योगपतींचे सुमारे दहा लाख कोटींचे कर्ज माफ करण्यात आले. ज्या संसदेच्या सभागृहात गरिबांना पाच किलो धान्य मोफत दिल्याबद्दल त्यांच्याकडून आभाराची अपेक्षा केली जाते, त्याच सभागृहात सांगितले जाते, की गेल्या पाच वर्षांत देशाला लुटणाऱ्या भ्रष्ट उद्योगपतींचे सुमारे दहा लाख कोटींचे कर्ज माफ केले गेले. या मोफत ‘रेवडी’चा लाभ घेणाऱ्यांत मेहुल चोक्सी आणि ऋषी अगरवाल या पळपुटय़ा भ्रष्ट उद्योगपतींचे नाव अग्रस्थानी आहे.
अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी संसदेत दिलेल्या माहितीच्या संदर्भासह वरुण गांधी यांनी देशाबाहेर पळून गेलेल्या दहा उद्योगपतींची यादीच ट्विटरवर प्रसिद्ध करून सवाल विचारला, की सरकारी खजिन्यावर पहिला हक्क कुणाचा आहे?
पंतप्रधानांनी करोना महासाथीच्या काळात ८० कोटी गरीब जनतेसाठी मोफत धान्य उपलब्ध करून दिल्याबद्दल ते अभिनंदनास पात्र आहेत, असा उल्लेख संसदेत भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी केला होता. त्याचा अप्रत्यक्ष संदर्भ वरुण यांच्या ट्वीटला आहे.
काही राजकीय पक्ष निवडणुकीतील फायदा डोळय़ांसमोर ठेवून मोफत सेवांचे आश्वासन देत असल्याबद्दल मोदींनी नुकतीच टीका करून देशाच्या विकासासाठी असे करणे नुकसानकारक असल्याचे म्हटले होते. त्यानंतर राजकीय वाद निर्माण झाला होता.

Leave a Reply