केंद्र सरकारकडून विरोधकांचा, जनतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरू – नाना पटोले

मुंबई : ५ ऑगस्ट – वाढती महागाई, बेरोजगारी आणि मोदी सरकारची दडपशाही या विरोधात आज काँग्रेसकडून देशभर आंदोलन छेडण्यात आले. मात्र मुंबईला काँग्रेस नेत्यांच्या आंदोलनापासून दूर ठेवण्यात आले. पोलिसांनी दडपशाहीचा, बलाचा वापर करत त्यांना आंदोलन करून दिले नाही, असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. त्याचबरोबर काँग्रेस नेत्यांनी आंदोलन करण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन मुंबईतील आझाद मैदान येथे नेऊन सोडले.
याप्रसंगी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, पूर्ण देशात काँग्रेसचे कार्यकर्ते रस्त्यावर आलेले आहेत. केंद्र शासनाकडून विरोधकांचा, जनतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे. ही मोहीम आता सुरू झालेली आहे. ‘नाचता येईना, अंगण वाकडे’ अशी भाजपची अवस्था झाली आहे. राहुल गांधींनी कालही सांगितले तुम्हाला जे करायचे ते करा; परंतु देशाच्या हिताची लढाई काँग्रेस लढेल असेही नाना पटोले म्हणाले. तसेच विरोधकांना राष्ट्रपतींना भेटू दिले जात नाही. देशात दबावतंत्र चालू आहे. याचा काँग्रेस निषेध करते. ही लोकशाही आहे, मोदींची दडपशाही नाही. अतिरेक करण्याचा प्रयत्न केला तर त्याला आम्ही उत्तर देऊ. आंदोलन स्थगित नाही, आंदोलन सुरू राहणार असा इशारा नाना पटोले यांनी दिला.
राज्यपाल महोदयांची भेट आम्ही घेऊन राहणार. शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने गनिमी कावा केला जातो. त्याच पद्धतीने आम्ही खेळत आहोत. हे आंदोलन संपलेलं नाही, आंदोलन सुरूच राहणार. मोठ्या प्रमाणात या मोर्चासाठी जी लोकं येणार होती त्यांना पोलिसांकडून थांबवण्यात आले. मीरा-भाईंदर, कल्याण-डोंबिवली या भागातून मोठ्या प्रमाणात लोक मोर्चाला यायला निघाले होती. परंतु त्यांना मुंबई शहराच्या बाहेरच थांबवण्यात आले. हे आंदोलन चिरडण्याचा, जनतेचा आवाज दाबण्याचा जो प्रयत्न केला आहे. पोलिसांच्या ताकतीने हा आवाज बंद करायचा प्रयत्न केला आहे. परंतु हे जास्त काळ टिकणार नाही. हे आंदोलन चालूच राहील, असेही नाना पटोले म्हणाले. या आंदोलनामध्ये काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांच्या सोबत, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, वर्षा गायकवाड, नितीन राऊत, अस्लम शेख, नसीम खान यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सामील झाले होते.

Leave a Reply