‘स्पुटनिक ५’ लसीच्या आपत्कालीन वापराला परवानगी

नवी दिल्ली : १३ एप्रिल – करोनाचा वेगाने फैलाव होत असताना देशाच्या लसीकरण मोहिमेस आणखी बळ मिळाले आहे. रशियाच्या ‘स्पुटनिक ५’ या लशीच्या आपत्कालीन वापराची शिफारस तज्ज्ञ समितीने भारताच्या औषध महानियंत्रकांना केली.
रशियाच्या ‘स्पुटनिक ५’ लशीला आपत्कालीन वापराची परवानगी देण्याबाबतच्या डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजच्या अर्जावर केंद्रीय औषध नियामक संस्थेच्या तज्ज्ञ समितीने सोमवारी चर्चा केली. लशीची सुरक्षितता आणि परिणामकारकतेसंबंधीच्या तपशिलाची पडताळणी केल्यानंतर समितीने ‘स्पुटनिक ५’ लशीच्या आपत्कालीन वापरास परवानगी दिली. आता ‘स्पुटनिक ५’ लशीच्या वापराबाबत भारताचे औषध महानियंत्रक अंतिम निर्णय घेतील. त्यांनीही मंजुरी दिल्यास ‘कोव्हिशिल्ड’ आणि ‘कोव्हॅक्सिन’नंतर भारताच्या करोनाविरोधी लढ्यात ‘स्पुटनिक ५’ या तिसऱ्या लशीचे बळ मिळणार आहे.
रशियन बनावटीच्या ‘स्पुटनिक ५’ लशीच्या भारतातील चाचण्या आणि वितरण हक्कासाठी डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजने गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये ‘रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंड’शी करार केला होता.
सध्या भारतात कोव्हिशिल्ड (ऑक्सफर्ड-अॅस्ट्राझेनेका- सीरम) आणि कोव्हॅक्सिन (भारत बायोटेक) या दोन लशींचा वापर सुरू आहे. भारतात सध्या करोना लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू आहे. १६ जानेवारीपासून आतापर्यंत देशात १० कोटी ४५ लाख २८ हजार ५६५ जणांना लस देण्यात आली आहे.
ऑक्टोबरपर्यंत भारतात पाच उत्पादकांकडून लशी उपलब्ध होणार आहेत. त्यात स्पुटनिक ५ लशीबरोबरच जॉन्सन अँड जॉन्सन (बायॉलॉजिकल इ), नोव्हाव्हॅक्स ( सीरम इंडिया), झायडस कॅडिला (झायकोव्ह डी) आणि भारत बायोटेकची नाकावाटे देण्याच्या लशीचा त्यात समावेश असणार आहे.
‘स्पुटनिक ५’ लस ही सर्व वयोगटांसाठी प्रभावी असल्याचा दावा करण्यात आला आहे. ‘स्पुटनिक ५’ लशीची परिणामकारकता ९१.६ टक्के असून त्याच्या तीन वैद्यकीय चाचण्या रशियात झाल्या आहेत. तिथे १९ हजार ८६६ जणांवर लशीच्या चाचण्या करण्यात आल्या होत्या.

Leave a Reply