आर्थिक मंदीवरून सुब्रमण्यम स्वामींचा पक्षाला घरचा आहेर

नवी दिल्ली : २ ऑगस्ट – भारतामध्ये मंदीची स्थिती निर्माण होणार नाही़. महागाईमुळे आर्थिक विकासाची गतीही कमी होणार नाही. उलट महागाई नियंत्रणात ठेवली जाईल, असा दावा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी लोकसभेत महागाईवरील चर्चेला उत्तर देताना केला आहे. चर्चेदरम्यान, संतप्त झालेल्या काँग्रेसच्या सदस्यांनी लोकसभेत सभात्याग केला. एकीकडे विरोधक निर्मला सीतारामन यांच्यावर टीका करत असताना भाजपाचे खासदार सुब्रहमण्यम स्वामी यांनीही घऱचा आहेर दिला आहे.
इंधनदरवाढ, इंधनावरील उपकर, खाद्यान्नाची महागाई अशा विविध मुद्दय़ांवर विरोधी पक्षांच्या खासदारांनी केंद्र सरकारला सोमवारी धारेवर धरलं. पण, महागाईवरील चर्चा वस्तुस्थितीवर आधारित नव्हे, तर केवळ राजकीय होती. विरोधकांचे आरोप चुकीच्या माहितीवर आधारित असल्याचं सीतारामन म्हणाल्या. अमेरिकेसारख्या विकसित देशांच्या अर्थव्यवस्था मंदीच्या गर्तेत जात असल्या तरी, भारतामध्ये मंदीची स्थिती निर्माण होणार नाही. महागाईमुळे आर्थिक विकासाची गतीही कमी होणार नाही. उलट महागाई नियंत्रणात ठेवली जाईल, असा दावा निर्मला सीतारामन यांनी केला.
“भारतीय अर्थव्यवस्थेत मंदीची स्थिती निर्माण होण्याची शक्यताच नाही, असं अर्थमंत्र्यांनी सांगितल्याचं मला प्रसारमाध्यमांमधून कळालं. त्या बरोबर बोलत आहेत, कारण भारतीय अर्थव्यवस्था आधीच गेल्या वर्षी मंदीत गेली आहे. त्यामुळे मंदीच्या स्थितीत जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही,” असा टोला सुब्रहमण्यम स्वामी यांनी ट्विटरच्या माध्यमातून लगावला आहे.
महागाईवर बोलताना काँग्रेस सरकारच्या काळात महागाईचे प्रमाण किती होते, याची तुलना केल्याशिवाय मोदी सरकारच्या काळात महागाई नियंत्रणात ठेवली गेली की नाही, हे समजणार नाही, असं सीतारामन म्हणाल्या़ खाद्यतेलाच्या किमती कमी करण्यासाठी पाम तेलावरील आयातकर ३५.५ टक्क्यांवरून ५.५ टक्क्यांपर्यंत खाली आणण्यात आल्या. सोयाबीन, सूर्यफूल तेलावरील आयात कर ३८.५ वरून ५.५ टक्क्यांवर आणला आहे. खाद्यतेलांच्या आयातीवरील नियंत्रणही काढून टाकलं आहे, आता खाद्यतेल कितीही प्रमाणात आयात करता येते. त्यामुळे खाद्यतेलांचे दर कमी होऊ लागले आहेत. मसूरसारख्या डाळींवरील ३० टक्के आयात करही शून्यावर आणलेला आहे. पोलाद आदी वस्तूंवरील आयातकरही कमी करण्यात आले आहेत. त्यामुळे महागाई आटोक्यात आणण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात आहे, असं सीतारामन यांनी स्पष्ट केलं.

Leave a Reply