केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची पोलिसांकर टीका

नागपूर : ३० जुलै – मी बरेचदा व्हीएनआयटीजवळील रस्त्यालगतच्या हातठेल्यावर भुट्टा खायला जातो. तेव्हा तेथील ठेलेवाले सांगतात,’साहेब पोलिसांचा प्रचंड त्रास आहे. फुकटचा भुट्टा खातात आणि पैसेही देत नाहीत.’ ही स्थिती योग्य नाही. गरीबांना जगण्याचा अधिकार आहे की नाही याचा प्रत्येकाने विचार करायला हवा,’ अशा शब्दांमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पोलिसांवर टीका केली.
नागपूर महानगरपालिकेतर्फे पीएम स्वनिधी योजना महोत्सवाचे आयोजन रेशीमबागेतील कविवर्य सुरेश भट सभागृहात करण्यात आले होते. त्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. मंचावर आमदार कृष्णा खोपडे, नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त राधाकृष्णन बी., नगर परिषद प्रशासन संचालनालयाचे आयुक्त तथा संचालक डॉ. किरण कुलकर्णी, विजयसिंग, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त दीपककुमार मीना अतिरिक्त आयुक्त राम जोशी, समाज कल्याण विभागाचे उपायुक्त विजय हुमने, समाज कल्याण अधिकारी रंजना लाड यांची उपस्थिती होती.
गडकरी म्हणाले,’शहरातील प्रत्येक एक लाख वस्तीच्या भागात स्वच्छ असे भाजीपाला आणि मटण मार्केट बनायला हवे. ही गोष्ट मी आजवर झालेल्या बहुतांश महापौरांना सांगून थकलो. पण, अद्याप यात पूर्णतः यश आलेले नाही. महापालिका, नासुप्रकडे अनेक जागा पडून आहेत. त्यावर अतिक्रमण होत आहे. या जागांवर हातठेले विक्रेत्यांसाठी ओटे तयार करून त्यांना अधिकृतरित्या रोजगार द्यायला हवा. गरिबाला जात, पंथ, धर्म नसतो. त्याला स्वाभिमानाने जगण्याची प्रेरणा देण्याची गरज असते. त्याची अंमलबजावणी या योजनेतून व्हायला हवी.’ तत्पूर्वी, सादर करण्यात आलेल्या गोंडी नृत्यावर उपस्थितांनी ठेका धरला. स्वनिधी योजनेचा लाभार्थी मोहम्मद अली याने सर्व लाभार्थींच्यावतीने मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमादरम्यान योजनेतील लाभार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन अंकिता मोरे यांनी केले.

Leave a Reply