संपादकीय संवाद – मुस्लिम किंवा इंग्रज संस्कृतीचा परिचय देणारे नावे बदलून भारतीय नावे देण्याची मागणी स्वागतार्हच

अहमदनगर शहर आणि जिल्ह्याचे नाव बदलून पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर नगर असे करण्यात यावे, अशी मागणी करणारे पत्र आमदार गोपीचंद पडळकर यांनी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांना पाठवले आहे, पडळकरांची ही मागणी निश्चितच स्वागतार्ह म्हणावी लागेल.
आपल्या देशात आठव्या शतकापर्यंत सर्व परिसरात हिंदूंचेच राज्य होते, नंतर आधी मुस्लिमांनी आक्रमणे सुरु केली, ही सुपीक भूमी असल्यामुळे त्यांनी इथेच राज्य करायचे ठरवले, तलवारीच्या जोरावर हळूहळू संपूर्ण प्रदेश त्यांनी काबीज केला. साधारणतः सोळाव्या शतकापर्यंत भारताच्या बऱ्याच मोठ्या भागावर मुस्लिमांची हुकूमत चालत होती. त्यामुळे त्यांनी भारतातील अनेक गावांची आणि शहरांची नावे बदलली, मूळची हिंदू नावे बदलून मुस्लिम नावे दिली गेली, अनेक ठिकाणी त्यांनी आपल्या सोयीसाठी नवी शहरे वसवली, तिथेही त्यांनी मुस्लिम नावेच दिली. आजही यातील अनेक नावे तशीच कायम आहेत.
मुस्लिमांनंतर सतराव्या शतकापासून इंग्रजांनी भारतावर कब्जा मिळवायला सुरुवात केली, त्यानंतर जवळजवळ दीडशे वर्ष म्हणजे १९४७ पर्यंत देशात इंग्रजांचेच राज्य होते, त्यांनी अनेक ठिकाणी मूळची नावे बदलून आपल्या सोयीची इंग्रजी नावे दिली. परिणामी देशाला स्वातंत्र्य मिळून दोन आठवड्यात पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत, तरीही मुस्लिम आणि इंग्रजांच्या गुलामीच्या खुणा अजूनही मोठ्या प्रमाणात कायम आहेत. अजूनही जुनी नावे कायम ठेवली आहेत.
नाही म्हणायला जनमताच्या रेट्यामुळे काही नावे बदलली गेली, मद्रासचे चेन्नई झाले, तर आता अलाहाबादचे प्रयागही होते आहे. लॉर्ड कर्झन या इंग्रज अधिकाऱ्याच्या नावे असलेला राजधानीतील रस्ता आता कस्तुरबा गांधी मार्ग म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. बॉंबेचे मुंबई झाले आहे. तर व्हीकटोरीया टर्मिनसचे छत्रपती शिवाजी टर्मिनसही झाले आहे. रेसकोर्स रोड आता लोककल्याण मार्ग म्हणून ओळखला जाऊ लागला आहे.
त्यामुळेच की काय, आता हळूहळू इतर शहरांचीही नावे बदलून जुनी मूळची नावे द्यावी किंवा मग भारतीय परंपरेला साजेशी नवी नावे द्यावी ही मागणी पुढे येऊ लागली आहे. त्यामुळेच महाराष्ट्र शासनाने औरंगाबादचे संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशिव असे नाव बदलण्यात यावे अशी मागणीही केली आहे.
याच पार्श्वभूमीवर अहमदनगर हे नाव बदलले जावे ही मागणीदेखील स्वागतार्ह आहे. या संदर्भातही महाराष्ट्र शासनाने लवकरात लवकर निर्णय घेऊन केंद्राकडे हा प्रस्ताव पाठवावा, अशी पंचानामाची मागणी आहे. नुकतीच महाबळेश्वर या पर्यटनस्थळी असलेल्या सर्व टुरिस्ट पॉइंटला इंग्रजांची दिलेली नावे बदलून भारतीय महापुरुषांची नावे द्यावी ही मागणी केली गेली होती, त्याचाही विचार व्हायला हवा.
भारत हा जगाच्या नकाश्यावर एकच देश आहे की ज्याचे भारतीय नाव भारत असे आहे, तर जागतिक स्तरावर हा देश इंडिया म्हणून ओळखला जातो, इंडिया हे नाव देखील इंग्रजांनीच दिलेले आहे, त्यामुळे हे नावदेखील बदलून जागतिक स्तरावर भारत हेच नाव प्रतिष्ठित केले जावे यासाठीही केंद्र सरकारसह प्रत्येक भारतीयाने प्रयत्न करावे, अशी पंचानामाची आग्रहाची विनंती आहे.

अविनाश पाठक

Leave a Reply