अकोला रेल्वे व खासदाराचे घर बॉम्बने उडवून देण्याची धमकी

अकोला : २७ जुलै – पूर्णा सुपरफास्ट पॅसेंजर रेल्वे आणि अकोल्याचे भाजपचे खासदाराचं घर बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यातआली. अशी माहीती मुंबईच्या पोलीस नियंत्रण कक्षाने अकोला पोलिसांना दिली. या माहितीनुसार अकोला-पूर्णा सुपरफास्ट पॅसेंजरमध्ये बॉम्ब ठेवल्याचा फोन येताच, अकोला पोलीस दलात खळबळ उडाली. रेल्वे पोलिसांसह अकोला पोलिसांनी काल मंगळवारी रात्री १० वाजून ४० मिनिटपर्यत संपूर्ण रेल्वेची तपासणी केली. यासोबतचं रेल्वेतील प्रवाशांची तपासणी झाली. तर खासदारांच्या निवासस्थानी बंदोबस्त वाढविण्यात आला.
अकोला रेल्वे पोलिसांना अकोला-पूर्णा सुपरफास्ट पॅसेंजर (रेल्वे क्रमांक १७६८३) या रेल्वेत बॉम्ब ठेवल्याचा आणि अकोल्याचे भाजपचे खासदार यांचे निवासस्थान बॉम्ब उडवून देण्याची धमकीचा फोन आला. त्यानंतर अकोला पोलिसांचे स्थानिक गुन्हे शाखेचे पथक, विशेष पथक, श्वान पथक, बॉम्ब पथक, जीआरपी, आरपीएफ, एससीआर पथकासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी अकोला रेल्वे स्थानकावर हजेरी लावली. अन् रेल्वे स्थानकावरून प्लॅटफॉर्म क्रमांक पाचवर उभी असलेली अकोला-पूर्णा सुपरफास्ट पॅसेंजरची तपासणी सुरु केली. या दरम्यान, रेल्वेच्या प्रवाशांची कसून चौकशीसह तपासणी झाली. या घटनेने काल अकोला पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली होती. श्वान पथकाद्वारे या सर्चिंगला सुरुवात झाली. बघता बघता सर्व रेल्वेच्या डब्यांची तपासणी झाली. या दरम्यान. रेल्वेमध्ये बसलेल्या प्रवाशांचे फोटो काढण्यात आले. झडती दरम्यान डब्यांमध्ये कोणतीही संशयास्पद वस्तू, संशयास्पद व्यक्ती आढळून आली नाही, त्यानंतर रेल्वे आपल्या मार्गाने रवाना झाली. अकोला जीआरपी पोलीस ठाण्याचे प्रमुख अर्चना गडवे आणि मुंबई पोलिसांद्वारे या बॉम्ब कॉलचा तपास सुरु आहे.
अकोल्याचे भाजपचे खासदार यांचे घरंही बॉम्बने उडवून देण्यात आल्याची धमकी देण्यात आली होती. त्यानंतर त्यांच्या घराशेजारील परिसराची तपासणी झाली. सध्या त्यांच्या निवासस्थानी पोलीस बंदोबस वाढवण्यात आला. तर रेल्वे पोलिसांनीही त्यांच्या निवासस्थानी भेटी दिल्या. या संदर्भात कुणी फोनवर माहिती दिली अन् फोन कुठून आला. याचा तपासही पोलीस करीत आहे.

Leave a Reply