जे नुकसान झालंय ते दाखवा अन्यथा उभा गाडीन आणि जोड्याने मारीन – भाजप आमदारांची अधिकाऱ्यांना तंबी

वर्धा : २७ जुलै – जिल्ह्यात सगळीकडे पावसाने हाहाकार सुरू आहे. सतत सुरु असलेल्या पावसामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन लोकप्रतिनिधी पाहणी करत आहे. अशातच आर्वी विधानसभा मतदार संघातील भाजप आमदार दादाराव केचे यांनी कारंजा तालुक्यात पाहणी दौरा केला. दरम्यान त्यांनी शेतकऱ्यांवर अन्याय होता काम नये जे नुकसान झालंय ते दाखवा अन्यथा उभा गाडीन आणि स्वतः जोड्याने मारीन, अशी धमकी वजा तंबी त्यांनी कनिष्ठ अभियंत्याला दिली.

कारंजा तालुक्यातील पारडी शिवारात भाजपा आमदार दादाराव केचे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केलीय. दरम्यान काही शेतकऱ्यांनी सिंचन विभागाचे कनिष्ठ अभियंता हे शेतकऱ्यांच्या खचलेल्या विहिरीच्या नुकसानिबाबत अहवाल तयार करताना भेदभाव करत असल्याचा आरोप केलाय. यावर आमदार दादाराव केचे चांगलेच संतप्त झाले. आमदार केचे यांनी कनिष्ठ अभियंत्याला बोलवत तुम्ही शेतकऱ्यांच्या विहिरी गायब केल्या, तुम्ही शेतकऱ्यांवर अन्याय करता, आताही करणार काय अन्याय, पुन्हा जर असा प्रकार झाला तर उभा गाडीन आणि कोणत्याही शेतकऱ्यावर अन्याय झाला तर स्वतः जोड्याने मारीन हे लक्षात ठेवा अशी तंबीच दिली.
शेतकऱ्यांच्या खचलेल्या विहिरीच्या नुकसानीचा अहवाल तयार करण्यासाठी २० हजार द्या, १० हजार द्या अशी मागणी केल्याची तक्रार आमदार दादाराव केचे यांच्याकडे करण्यात आली. त्यावर ज्यांनी पैसे दिले त्यांच्या विहिरी बरोबर दाखविल्या जातात, यापुढे आता असे चालणार नाही शेतकऱ्यांवर अन्याय नको असे निर्देशही त्यांनी दिले.
जिल्ह्यात पावसामुळे शेतकऱ्यांसह सामान्य नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. लोकप्रतिनिधीकडूनही पाहणी दौरे करून पंचनामे करण्याच्या सूचना देण्यात येत आहे. मात्र संकटात सापडलेल्या नागरिकांना आता तातडीने मदत मिळावी हीच अपेक्षा आहे.

Leave a Reply