शेवटच्या श्वासापर्यंत विद्यार्थ्यांना शिकवणार – ९३ वर्षाच्या प्राध्यापिका संतम्मा

अमरावती : २६ जुलै – आजकाल केवळ सरकारी नोकरी आहे म्हणून शिक्षकी पेशा निवडण्याचं प्रमाण वाढलेलं असताना, खऱ्या अर्थाने पिढी घडवणारे ‘शिक्षक’ तसे दुर्मिळच. अशा शिक्षकांसाठी रिटायरमेंट, किंवा अशा कोणत्याही गोष्टी त्यांच्या कामात अडथळा ठरू शकत नाहीत. अशाच एक शिक्षिका आहेत, प्राध्यापिका संतम्मा. प्रोफेसर संतम्मा या 93 वर्षांच्या आहेत. त्यांना निवृत्त होऊन कित्येक वर्षं झाली आहेत. तसंच, गुडघ्याच्या शस्त्रक्रियेमुळे त्यांना कुबडी घेऊन चालावं लागतं. मात्र, एवढं सगळं असूनही त्या आजही अगदी पूर्वीप्रमाणेच विद्यार्थ्यांना शिकवतात.
आंध्र प्रदेशशातील विजयानगरम येथे असणाऱ्या सेच्युरियन विद्यापीठात गेल्या 60 वर्षांपासून त्या शिकवतात. फिजिक्स हा त्यांचा विषय आहे. एका मुलाखतीत संतम्मा यांनी सांगितलं, की त्यांच्यासाठी वय हा केवळ एक आकडा आहे. “माझ्या आई वन्जक्शम्मा 104 वर्षे जगल्या. आपले आरोग्य आपल्या मेंदूवर ठरते, आणि आपली संपत्ती आपल्या हृदयावर. त्यामुळे नेहमीच मेंदू आणि हृदय या दोन गोष्टी निरोगी ठेवण्याचा प्रयत्न आपण करायला हवा. मी काही स्वतःची तुलना थेट अल्बर्ट आईनस्टाईनशी नाही करत. मात्र, मी इथे एका उद्देशासाठी आहे. ते म्हणजे, शेवटच्या श्वासापर्यंत विद्यार्थ्यांना शिकवणार” असं संतम्मा म्हणाल्या.
8 मार्च 1929 साली मछलीपट्टणम येथे संतम्मा यांचा जन्म झाला. त्या केवळ 5 महिन्यांच्या असतानाच त्यांच्या वडिलांचं निधन झालं. त्यांच्या मामाने त्यांचं पालन पोषण केलं. 1945 साली त्या एव्हीएन कॉलेज, विशाखापट्टणम येथे बारावीचं शिक्षण घेत होत्या. या वेळी त्यांना महाराज विक्रम देव वर्मा यांच्या हस्ते फिजिक्ससाठी गोल्ड मेडल मिळालं होतं. पुढे आंध्र युनिव्हर्सिटीमधून त्यांनी फिजिक्स विषयात बीएससी केलं. पुढे त्यांनी मायक्रोवेब स्पेक्ट्रोस्कोपी विषयात डी.एससी (पीएचडी स्तराची पदवी) केलं. 1956 साली फिजिक्सच्या लेक्चरर म्हणून त्यांनी आंध्र युनिव्हर्सिटीच्या कॉलेज ऑफ सायन्समध्ये नोकरी सुरू केली.
60 वर्षं वय झाल्यानंतर, 1989 साली त्या सेवानिवृत्त झाल्या. मात्र, त्यांनी शिकवणं थांबवलं नाही. आजही त्या दिवसाला सहा लेक्चर घेऊ शकतात. विद्यार्थ्यांवरही याचा भरपूर प्रभाव पडतो. ते संतम्मा यांचं लेक्चर आजिबात चुकवत नाहीत. संतम्मा कधीही आपल्या क्लासला उशीरा पोहचत नाहीत. फिजिक्सशिवाय त्यांना वेद, पुराण, उपनिषदं अशा विषयांचीही आवड आहे. त्यांनी गीतेमधील श्लोकांचं इंग्रजी भाषांतर करून ‘भगवद्गीता दी डिव्हाईन डायरेक्टिव्ह’ हे इंग्रजी पुस्तकही पब्लिश केलं आहे. विद्यार्थी त्यांना चालता-बोलता एनसाक्लोपीडिया म्हणतात.
विविध ठिकाणी काम, घरही केलं दान
संतम्मा यांनी काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रीयल रिसर्च , युनिव्हर्सिटी ग्रांट्स कमिशन, डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी अशा कित्येक सरकारी संस्थांमध्येही काम केलं आहे. सोबतच, त्यांनी विवेकानंद मेडिकल ट्रस्टला आपलं घरही दान केलं आहे. सध्या त्या भाड्याच्या घरात राहतात.
संतम्मा या खऱ्या अर्थाने वचनबद्धता, समर्पण या शब्दांचं एक जिवंत उदाहरण आहेत. त्यांचा आदर्श सध्याच्या इतर शिक्षकांनी, आणि सर्वच क्षेत्रातील व्यक्तींनी घेणे गरजेचे आहे.

Leave a Reply