बिबट्याची कातडी व खवले मांजराच्या खवल्यांसह ५ आरोपींना अटक

नागपूर : २४ जुलै – नागपूर वनविभागाने गोंदिया विभागाच्या पथकासह संयुक्त कारवाई करत बिबट्याची कातडी व खवले मांजराच्या खवल्यांसह पाच आरोपींना अटक केली. गोंदिया येथे ही कारवाई करण्यात आली. गोंदिया येथे बिबट्याच्या कातडीची तस्करी होणार असल्याची माहिती नागपूर वनविभागाला मिळाली. या तस्करीवर वनखाते नजर ठेवून होते. सापळा रचून पाचही आरोपींना अटक करण्यात आली.
निखिल आगडे, कैलास घुमके, हेमराज उके, मिथून घुमके, मनोज मानकर अशी आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून बिबट्याचे एक कातडे व खवले मांजराचे ३.२५ किलो खवले आणि दुचाकी जप्त करण्यात आली. आरोपींविरुद्ध वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ अंतर्गत विविध कलमान्वये वनगुन्हा नोंदवण्यात आला. हा सापळा सडक अर्जूनी वनपरिक्षेत्र, जांभळी उपक्षेत्र, डोंगरगाव/खजरी नियतक्षेत्रात रचण्यात आला.
ही कारवाई प्रादेशिक वनखात्याचे मुख्य वनसंरक्षक रंगनाथ नाईकडे, उपवनसंरक्षक राहुल गवई, गोंदिया उपवनसंरक्षक कुलराज सिंह यांच्या मार्गदर्शनात दक्षता पथकाचे विभागीय वनाधिकारी पी.जी. कोडापे, सहाय्यक वनसंरक्षक नरेंद्र चांदेवार, सहाय्यक वनसंरक्षक पाटील, वनपरिक्षेत्र अधिकारी लहू ठोकळ तसेच वाय.डी. ताडाम, नीलेश तवले, गणेश जाधव, दिनेश पडवळ, विनोद शेंडे, सुधीर कुलुरकर, संदीप धुर्वे, सडक अर्जूनी येथील कर्मचारी यांनी केली. पुढील तपास सहाय्यक वनसंरक्षक प्रदीप पाटील करत आहेत.

Leave a Reply