संपादकीय संवाद – नव्या राष्ट्रपतींचे अभिनंदन

2 apr avinash pathak2

ओरिसातील आदिवासी नागरिक असलेल्या द्रौपदी मुर्मू यांची देशाच्या १५ व्या राष्ट्रपती म्हणून निवड झाली आहे, देशातील त्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती आहेत, तर आदिवासी समाजातील पहिल्याच राष्ट्रपती आहेत. त्यांच्या या निवडीबद्दल पंचानामातर्फे त्यांचे हार्दिक अभिनंदन.
देशाला स्वातंत्र्य मिळाल्यावर भारताची घटना बनवली गेली, या घटनेने भारत हा प्रजासत्ताक म्हणजे जनतेची सत्ता असलेला देश म्हणून घोषित झाला, त्यामुळे सामान्यातला सामान्य माणूसही देशात सर्वोच्च पदी विराजमान होऊ शकतो हे निश्चित झाले. त्यामुळेच वेळोवेळी होणाऱ्या निवडणुकांमधून सत्ताबदल होऊ शकला, त्यामुळेच २०१४ मध्ये चहा विकून शिक्षण घेणारा माणूस या देशाच्या पंतप्रधानपदी पोहोचू शकला. २००७ साली प्रथमच एक महिला देशाची राष्ट्रपती बनली. २०१७ मध्ये एक दलित व्यक्ती देशाची राष्ट्रपती बनू शकली. आता २०२२ मध्ये आदिवासी महिला या देशाची राष्ट्रपती बनते आहे. ही निश्चितच अभिमानाची बाब आहे, यासाठी घटनाकारांप्रती आणि ती घटना स्वीकारणार्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करणे आवश्यक ठरते.
भारतात आदिवासी समाज हा अजूनही मागासलेलाच आहे. या समाजातील फार थोडे लोक पुढे आलेले आहेत. अश्या परिस्थितीत एक आदिवासी महिला या देशाची राष्ट्रपती बनली, ही घटना निश्चितच आशादायी म्हणावी लागेल. द्रौपदी मुर्मू यांच्या कार्यकाळात देशातील संपूर्ण आदिवासी समाज विकासाच्या मुख्य प्रवाहात आलेला असेल, अशी अपेक्षा करण्यात हरकत नसावी.
या निमित्ताने द्रौपदी मुर्मू यांच्या कार्यकाळाला पंचनामाच्या हार्दिक शुभेच्छा….. त्यांच्या कार्यकाळात भारत जागतिक महासत्ता बनण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करावी याबाबत कोणाच्याही मनात शंका नसावी..

अविनाश पाठक

Leave a Reply