आम्हाला दुसऱ्याच्या घरात झाकून पाहण्याची सवय नाही – शिवसेनेच्या मुद्द्यावर नाना पटोलेंची प्रतिक्रिया

भंडारा : २० जुलै – आम्हाला दुसऱ्याच्या घरात झाकून पाहण्याची सवय नाही, असे वक्तव्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भंडाऱ्यात केले आहे. शिवसेनेचे बारा खासदार शिंदे गटात जात असल्याच्या प्रश्नाबाबत त्यांनी हे वक्तव्य केले आहे. काँग्रेसची लोकांच्या घरात झाकून पाहण्याची सवय नसून आमचे लक्ष केवळ जनतेच्या प्रश्नाकडे आहे. सध्या भंडारा जिल्ह्यात पूर परिस्थिती आली असून आमचे लक्ष सध्या पूर परिस्थितीकडे आहे. शिवसेनेचे बारा खासदार शिंदे गटासोबत गेले या विषयावर नाना पटोलेंनी बोलणं टाळलं.
भाजप खासदार अनिल बोंडे काय बोलतात यांच्या बोलण्यात काही तारतम्य राहत नाही, असा खोचक टोलाही यावेळी नाना पटोलेंनी लगावला. महाविकास आघाडी सरकार तीन चाकी सरकार होतं. मात्र समन्वयाचा अभाव असल्यामुळे हे सरकार कोसळल्याचे वक्तव्य भाजप चे राज्यसभा खासदार अनिल बोंडे यांनी केले होतं.
नाना पटोलेंनी अनिल बोंडेंच्या याच वक्तव्याचा समाचार घेतला. अनिल बोंडे यांच्या बोलण्यात समन्वय नसल्याचा टोला नाना पटोले यांनी लावलेला आहे. त्यांच्याविषयी काय बोलावे आमच्यासाठी जनतेचे प्रश्न महत्वाचे असल्याचे म्हणत नाना पटोले यांनी अनिल बोंडे यांच्या वक्तव्याकडे दुर्लक्ष केले आहे.

Leave a Reply