बकुळीची फुलं : भाग ३९ – शुभांगी भडभडे

5 sep shubhangi bhadbhade

ऑस्टीन गाडी घरी आल्याचा सर्वांचं खुप आनंद झाला . पण शिकवण्यासाठी विद्यार्थी तर हवेत . ही एक मोठी जबाबदारी अंगावर येऊन पडली . आणि ह्यांनी लगेच स्विकारावी .
खाली उतरलं आणि दोन घरं अलिकडे गेलं की संघ शाखा होतीच . संघाचे ते निष्ठावंत अनुयायी होते . मिलीटरीमुळे त्यांना संघ शाखेत जाणं जमलं नव्हतं . पण शिलांगला श्री गुरूजींना ते आवर्जून भेटायला गेले होते .  तीच ती आठवण त्यांनी अनेकदा सांगितली होती.
   आज ते सकाळी संघ शाखेत गेले. आणि तीन विद्यार्थी त्यांना मिळाले . अगदी
दुस-याच दिवसापासून. आणि वर्षभरानंतर स्वतः ची कमाल पुन्हा सुरू होणार होती . वर्षभरात मिळालेला फंड संपला होता. आता ख-या अर्थाने नव्या जीवनाला सुरूवात झाली होती .
   विद्यार्थी येत होते , वाढत होते . आणि आनंदही वाढता होता . सहा महिने झाले होते. हे म्हणाले
     “दोन तीन महिन्यांत कर्नल सोमण यांचे पैसे पूर्ण  होतील . मग ही आपलीच गाडी. माझ्या मनात आहे. आपण ड्रायव्हिंग स्कूल असं लिहू आणि ह्या स्कूलला गुरूदत्त ड्रायव्हिंग स्कूल असं नाव देऊ , पेपरला जाहिरात देऊ .  आपली गाडी झाली की , सर्वांना घेऊन फिरायला मनमोकळी जाता येईल”
  एकामागोमाग एक यांच्या कल्पना ऐकून मला धन्य वाटलं. त्यात त्यांनी त्यांची जूनी कल्पनाही सांगितली . “
गाडी शिकवताना प्रत्येक विद्यार्थ्याला गाडीचं ज्ञान असायला हवं. मी तीन महिन्यांचा कोर्स तयार करतो. आणि ही गाडी आपल्या नावावर झाली की, सारे प्रयोग करतो “.
रोज सकाळी कर्नल सोमणांकडे सायकलवर जाऊन गाडी आणायची , विद्यार्थ्यांना शिकवायचं आणि  संध्याकाळी गाडी सोमण यांच्याकडे ठेवून  सायकलवर परत यायचं . हे सारं ते आनंदाने करत होते .
पुढची स्वप्नं साकार करण्याची त्यांना आता घाई झाली होती.
    त्यांचं वेळी आम्हाला घर सोडावं असं  घरमालकाकडून सांगण्यात आलं . पण कारण काय यांचं उत्तर नव्हतं , लाईट बिल , पाणीबिल, घरभाडं वेळच्या वेळीच होतं . 
कारण तर कळलं नाही .आमचा त्यांचा कसला वादही नव्हता . शेवटी स्वस्त आणि छान घर आम्हाला हवं होतं आणि पेपरला जाहिरात आली. श्याम बंड यांचा बंगला भाड्याने द्यायचा होता पण तो कुठे तर स्नेहनगर जवळ . बंगला नवा होता . भांडं कमी होतं पण विद्यार्थ्यांना शिकवायला जायचं म्हणजे पेट्रोल खर्च वाढणारच होता .
   त्यात ह्यांनी मेडिकल कॉलेज रोड वर एक भाड्याने ऑफीस घेतलं . विद्यार्थी मिळायचे होते पण भाडं सुरू झालं होतं.‌
    अडचणीत अडचण येत होती
          एक दिवस ह्यांनी गुरूदत्त ड्रायव्हिंग स्कूल ची जाहिरात पेपरला दिली त्याखाली  तीन महिन्याच्या गाडी रिपेअरींग थिअरी च्या कोर्सचीही जाहिरात दिली . आम्ही अजून  स्नेह नगरला जायचोच होतो तर एक दिवस सकाळी सकाळी एक सभ्य वाटणारे गृहस्थ आले . एडमिशन घ्यायचीय  म्हणाले.
  ह्यांनी सगळी माहिती दिली . बरं उद्या येतो म्हणून ते गृहस्थ निघून गेले .
दोन दिवसांनी ह्यांना नागपूर आरटीओची नोटीस आली . आरटीओ च्या अधिकृत नियमानुसार हे स्कूल नाही म्हणून .
हे आरटीओ मधे गेले आपली जीवनकथा सांगताना आपली भूमिका आणि आपलं अज्ञानही सांगितलं.
त्यावेळी श्री भट म्हणून आरटीओ होते .
  त्यांनी सारं समजावून सांगितलं आणि नियमानुसार फार्म भरायला सांगितला. एवढंच नव्हे तर कुठेही , कशाचीही अडचण आली तर  मदतीचं आश्वासन दिलं .
पण काही करून गाडीचा पासिंग होतं नव्हतं , स्कुलला अधिकृत परवानगी मिळत नव्हती . त्यामुळे ड्रायव्हिंग बंद होतं.
आठच दिवसात ड्रायव्हिंग स्कूल रजिस्टर्ड झालं. कसं झालं ह्याची कल्पना जवळजवळ तीन महिन्यांनी आली. तोवर थिअरी क्लासेस सुरू झाले होतै. एक दार बंद झालं की दुसरं उघडत होतं.
  कितीही कसून आणि व्यवस्थित शिकवलं तरी  आरटीओ मधे विद्यार्थी एखादा औषधाला पास तर बाकी सारेच नापास होत होते. पास करण्यासाठी विद्यार्थ्यांची गुणवत्ता  आवश्यक नव्हती तर चिरीमिरी द्यावी लागत होती आणि हे ह्यांना अजिबात मान्य नव्हतं.
  शेवटी नाईलाजाने हे आरटीओ  श्री. भट यांना भेटायला गेले. तीन महिन्यात नापास झालेल्यांची संख्या सांगितली. आरटीओ श्री भट म्हणाले
  “विद्यार्थी मी स्वतः पाहिलेत . उत्तम विक्रेते , नावं ठेवायला जागा नाही . पण तुमच्या सारख्या सत्यवादी व्यक्तीला दिसत असून समजावून घ्यायचं नसेल तर मी काय सांगू ?
पण एवढंच सांगतो , तुमची प्रमाणिकता आज कामाची नाही .   तुम्हाला आजच्या जगात इतकं सत्य वागून चालणार नाही .
तुम्ही मला कर्नल सोमण ची कथा सांगितली ,  मनाला स्पर्श करून गेली म्हणूनच  मी स्वतः तुमच्या ड्रायव्हींग स्कूलला अनुमती दिली .  आणि जोवर मी नागपूरला आहे तोवर तुम्हाला कुठल्याही इन्स्पेक्टर कडे परीक्षेत साठी जावं लागणार नाही . आय प्रॉमिस.” हे ऐकतांना, डोळे भरून आले. अशीही देवमाणसं भेटावीत हा योग गुरूदत्तामुळे आला असं ह्यांना वाटलं .
पण मला वाटलं , ह्यांचे प्रामाणिक प्रयत्न, सचोटी आणि देवाचा विश्वास त्यांना तारून नेत होता.
प्रश्न सुटला होता, पुढचा प्रश्न लगेचच येईल असं वाटलं नव्हतं.
आता पुढे……..
             

शुभांगी भडभडे

Leave a Reply